“ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत?” मनसेचा सवाल

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर मराठी चित्रपट कलाकरांच्या अनेकदा पाठीशी उभे राहिले आहेत. मराठी सिनेमांवर अन्याय झाल्यास त्यांनी नेहमी पुढाकार घेऊन मार्ग सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता अमेय खोपकर यांनी मुंबईतील गोरेगाव भागातील फिल्मसिटीबद्दल ट्वीट केले आहे. यात गोरेगाव फिल्मसिटीकडे जाणारा रस्त्याची झालेली दुर्दशा त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पाहायला मिळत आहे. याप्रकरणी अमेय खोपकरांनी ट्विट करत सरकारला खडेबोल सुनावले आहे.
गोरेगाव फिल्मसिटीकडे जाणाऱ्या रस्त्याचा फोटो शेअर करत अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “मुंबईला मायानगरी म्हणतात ते या दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमुळे. इथे ४२ आउटडोअर शूटिंग लोकेशन्स आणि १६ स्टुडिओ फ्लोअर्स आहेत. टीव्ही मालिका, चित्रपट यांच्या शूटिंगसाठी हजारो माणसं इथे उपनगरातून येत असतात, पण आत प्रवेश केल्यावर अशा घाणेरड्या रस्त्यांवरुन ये-जा करावी लागते. ग्लॅमर दिसलं की हुरळून जाणाऱ्या राजकारण्यांना हे खड्डे दिसत नाहीत? तुम्ही सुविधाच दिल्या नाहीत म्हणून उद्या हा चित्रपट उद्योग राज्याबाहेर गेला तर त्यांना चूक तरी कसं म्हणणार?” असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, पावसाळा सुरु होताच अनेक रस्त्यांची चाळण झाल्याचे दिसते. अनेक रस्त्यांवर खड्डे होतात यामुळे मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडतात. मात्र दरवर्षी असे चित्र दिसत असतानाही अद्याप यावर कोणताही ठोस उपाय करण्यात आलेला नाही. या उलट नागरिकांनाच हा सगळा त्रास सहन करावा लागतो. फिल्मसिटीच्या रस्त्यावरही हीच परिस्थिती निर्माण झाल्याने अमेय खोपकर यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. सध्या त्यांचे हे ट्वीट चर्चेत आले आहे.





