“शिवसेनेला ५ वर्षे मुख्यमंत्री पद द्या, पण युतीचं सरकार स्थापन करा; केंद्रीयमंत्र्यांचं मोठं विधान!

मुंबई – भाजप आणि शिवसेना यांच्यातील अनेक वर्षांची मैत्री तुटली आणि राज्यात नवीन समीकरण उदयास आलं. ते म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचा प्रयोग. यामुळे सहाजिकच भाजप सर्वाधिक जागा जिंकूनही सत्तेपासून दुरावला आहे. भाजपच्या मनात याची सल आहेच. त्यातच आता एका केंद्रीयमंत्र्यांनी केलेल्या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. या निमित्त सर्वपक्षीय नेत्यांकडून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी देखील बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. तसेच राज्यात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप-आरपीआय सरकार स्थापन व्हावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे सरकार स्थापन करणे हीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरांजली ठरेल, असं आठवले यांनी नमूद केलं. त्यासाठी शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपाला ५० टक्के सत्तेतील वाटा द्यावा, असं समीकरणही त्यांनी मंडलं. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
याआधी रामदास आठवले यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवेसना आणि भाजप यांच्यात वाटून घ्यावं, असं मत मांडलं होता. मात्र आता ते पाच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यास तयार झाले आहेत.





