Dhangar Reservation : धनगरांना टिकणारे आरक्षण देऊ ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे. गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेल्या या आमरण उपोषणामुळे धनगर समाज संतप्त झाले आहेत. त्यामुळे या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आज, रविवारी (15 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावर धनगर समाजासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर मंत्री शंभुराज देसाई यांनी धनगर समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती दिली.
माध्यमांशी बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, सखल धनगर समाजाच्या लोकांची आजच्या शिष्टमंडळाची मागणी होती की, धनगर आणि धनगड हे एकच आहेत, अशापद्धतीचा स्वतंत्र जीआर सरकारने काढावा. तो जीआर कशापद्धतीने असावा यासाठी तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची समिती तसेच त्या समितीबरोबर सखल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज बैठकीला आले होते.
त्यातील पाच प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापन करून त्यांनी जीआरचा मसूदा कसा असावा. तसेच जीआर काढला तर तो न्यायालयात टिकला पाहिजे. याबाबतीत सात लोकांची जी समिती केली आहे, ती पुढील पाच दिवसांमध्ये जीआरचा ड्राफ्ट तयार करतील. ऍड. जनरल यांचा त्या जीआरवर सल्ला घेतला जाईल आणि पुढची कार्यवाही सकारात्मकदृष्टीने करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आहे.
शंभुराज देसाई म्हणाले की, या बैठकीमध्ये जे निर्णय झालेले आहेत, त्यात सखल समाजाच्या सर्व प्रतिनिधींनी सहभाग घेतला. जे लोक पंढरपूरमध्ये उपोषण करत आहेत, त्यांना राज्य सरकारच्या वतीने उपोषण स्थगिती करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच विभागीत आयुक्त पुणे यांना उपोषणस्थळी पाठवणार आहोत. याशिवाय बैठकीला आलेल्या त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की, सरकारचा प्रतिनिधी आमच्यासोबत पाठवा. आम्ही उपोषणा करणाऱ्या लोकांशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती त्यांनी दिली.





