“कुस्तीपटूंना न्याय द्या..’ – नीरज चोप्रा

नवी दिल्ली -भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरुद्ध कुस्तीपटू गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. हे पाहून खूप वेदना होत आहेत, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, असे मत भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने व्यक्त केले आहे. तसेच त्याने या कुस्तीपटूंना आपले पूर्ण समर्थन असल्याचेही सांगितले.
कुस्तीपटूंच्या आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे तसेच अनेक पक्षांतील राजकीय नेतेही या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत.
ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. खेळाडूंना रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करावी लागते हे पाहूनच वेदना होत आहेत. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी देशाची शान वाढवली त्यांनाच आपल्यावरील अन्याय दूर व्हावा यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही शोकांतिका आहे.
जे काही सध्या घडत आहे ते वाईट आहे. हे संपूर्ण प्रकरण अत्यंत पारदर्शकपणे व संवेदनशीलपणे हाताळले गेले पाहिजे, असे नीरज म्हणाला. दरम्यान, देशाची स्टार खेळाडू विनेश फोगटने खेळाडूंवर होत असलेला अन्याय पाहूनही क्रिकेटपटू अद्याप काहीही का बोलत नाहीत तसेच व्यक्त का होत नाहीत, असा सवाल
केला होता.
उषा यांच्यावर बजरंगची टीका
खेळाडूंच्या आंदोलनामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे वक्तव्य भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा व भारताच्या महान धावपटू पी. टी. उषा यांनी केले होते. त्यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाने टीका केली आहे. एक महिला असूनही व खेळाडू म्हणून महान असूनही उषा यांचे वक्तव्य खेदजनक आहे.
खेळाडूंवर अन्याय होत असताना देशाची प्रतिमा मलिन होत नाही का, असा संतप्त सवालही बजरंगने उषा यांना केला आहे. तसेच ऑलिम्पिक संघटना व सरकारने ब्रीजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे आश्वासन देऊनही पुढे कारवाई केरी नाही. हे सर्व थांबायला हवे व तातडीने खेळाडूंना न्याय मिळायला हवा, अशी मागणीही त्याने केली आहे.





