Junnar News : दुधाला वाढीव बाजारभाव द्या; सचिन थोरवे यांची मागणी

ओझर : गाईच्या दुधाला ४० रुपये लीटर व म्हशीच्या दुधाला 70 रुपये बाजारभाव देण्याची मागणी दूग्धविकास मंत्री यांच्याकडे जुन्नर तालुका शेतकरी संघटना युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी केली आहे.
शेतकरी संघटनेच्या वतीने – मुंबई येथे दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांची जुन्नर तालुका शेतकरी संघटना युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन थोरवे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अर्थकारण हे दुधावर अवलंबून असून गेली अनेक वर्षांपासून दूध दरवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे.सध्याच्या बाजार भावानुसार शेतकऱ्याला दूध धंदा करणे परवडत नसल्यामुळे दूग्ध व्यवसाय करणारा शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.
दरम्यान,म्हशींच्या दुधाला ७० रुपये बाजार भाव मिळावा अशी मागणी केली आहे. दुधाला बाजार भाव मिळाले नाही तर शेतकऱ्यांना ही जनावरे फुकटच्या भावात विकावी लागतील किंवा जंगलात सोडून द्यावे लागतील. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येऊन आर्थिक संकट येऊ शकते या सर्व गोष्टीचा सरकारने गांभीर्याने विचार करावा आणि दूध दरवाढ करावी अशी मागणी केली आहे.





