पुणे – राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाचा सर्वाधिक फटका शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर बसला असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील शिक्षण व परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी युवासेनेने राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात युवासेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी मुख्यमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे निवेदन सादर केले आहे. अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे ६८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. यामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक स्थिती हलाखीची झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवणे कठीण झाले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे २०२५-२६ मधील शिक्षण व परीक्षा शुल्क तातडीने माफ करावे. सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी कोणतीही शुल्कवाढ लागू करू नये, यासाठी शुल्क नियामक प्राधिकरणाला निर्देश द्यावेत. खासगी विद्यापीठांनीही पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शुल्क माफ करावी. राज्य सरकारने तातडीने निर्णय प्रसिद्ध करून, सर्व सरकारी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांना अंमलबजावणीचे आदेश द्यावेत. शुल्कासाठी सक्ती करणाऱ्या संस्थांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी युवासेनाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा कल्पेश यादव यांनी दिला आहे.