यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न तर अंतुले यांना पद्मश्री द्या; सुनिल तटकरे यांची लोकसभेत मागणी

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांना पद्मश्री देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे लोकसभेतील एकमेव खासदार सुनिल तटकरे यांनी आज लोकसभेत केली. एवढेच नव्हे तर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी सुध्द तटकरे यांनी केली. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. या चर्चेत सहभागी होताना राकॉ खासदार सुनिल तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे तोंडभरून कौतुक केले. मोदी यांची ही तिसरी टर्म आहे. मात्र, पहिल्या आणि दुसऱ्या टर्ममध्ये मोदी सरकारने महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी भरपूर मदत दिली आहे. रालोआ सरकारच्या काळात अटल सेतू झाला. मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये मेट्रोचे जाळे उभे झाले आहे, असेही ते म्हणाले.
तटकरे म्हणाले की, मी या देशातील एकमेव असा खासदार आहे ज्याचा मतदारसंघात चार-चार भारतरत्नांचा जन्म झाला.आता मोदी सरकारने महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करावा. माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना पद्मश्री पुरस्कार देवून गौरव करावा. एवढेच नव्हे तर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी सुध्दा त्यांनी केली. मी हिंदी आणि इंग्रजी भाषेतही बोलू शकतो. परंतु, जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी मराठीतच भाषण करणार, अशी प्रतिज्ञा सुध्दा तटकरे यांनी यावेळी घेतली. रायगडमध्ये महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे निर्माण झाले आहे. पंरतु, मुंबई- गोवा महामार्ग होवू शकला नाही याची मला खंत आहे. भविष्यात सरकार याकडे लक्ष देईल याची मला खात्री आहे. 1947 मध्ये हा देश कसा होता, हे आम्हाला माहित नाही. परंतु, भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा अर्थात 2047 मध्ये भारत विकासाच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकल्याशिवाय राहणार नाही.
सुनिल तटकरे मोदी सरकारचा उदोउदो करीत होते तेव्हा समोरच्या बाकावर बसलेले शिवसेनेचे (उबाठा) उध्दव ठाकरे यांनी दोन पदकवीर या मथळयाची बातमी असलेला पेपर दाखविला. यावर तटकरे म्हणाले की, अरविंदजी मोदी सरकारच्या काळात फक्त दोनच पदकवीर आहेत असे अजिबात नाही. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुध्दा पदकवीर आहेत. यामुळे, आता तरी मोदी सरकारला विरोध करण्याचे सोडा आणि सरकारचे कौतुक करा. मुळात अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रप्रदेशला झुकते माप दिल्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे दोनच पदकवीर असल्याच्या बातम्या छापून आल्या होत्या. अरविंद सावंत यांनी हीच बातमी दाखविली.





