बुलढाणा : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. त्यातच कुठे ऑक्सिजनची कमतरता तर कुठे इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता सरकारमधील मंत्री देखील संतप्त झाल्याचे पहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिविरसाठी वणवण फिरत आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी याबाबत संताप व्यक्त करुन राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे. यामुळे रुग्नांच्या मृत्यू दरात वाढ झालेली आहे. याबाबत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, एकीकडे रुग्णाचे नातेवाईक इंजेक्शनसाठी वणवण फिरत असताना त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही, मात्र एजंटाकडे इंजेक्शन उपलब्ध आहेत. हा टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असून बाहेरून इंजेक्शन कसे मिळतात हे मला हे दाखवा मी माझ्या घरातून एक कोटी रुपये द्यायला तयार आहे. मी इंजेक्शन घेतो व रुग्णांना मोफत वाटतो रुग्णांचे जीव तरी वाचतील. संतप्त प्रतिक्रिया देत आमदार संजय गायकवाड यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. बुलढाणा जिल्हा राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे होमटाऊन आहे.