Pune : साखर उद्योगात “जीआयएस’चा उपयोग करावा

पुणे : साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स , रिमोट सेन्सिंग व जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (GIS) वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या
सहकार विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्रीफडणवीस यांनी आज आढावा घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. हे तंत्रज्ञान वापरतात आल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांसाठीही ते फायदेशीर ठरू शकते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गाळपासाठी उपलब्ध ऊसाचे योग्य नियोजन करणे सोपे होईल.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत राज्यात 100 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये जागेनुसार 300 मे. टन ते 1000 मे. टनाची गोडाऊन बांधण्यात येणार आहेत. यातून गडचिरोली, नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यांतही गोडाऊन उभी करावीत.
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे 100 टक्के डिजिटायझेशन करण्यावर भर द्यावा. साखर कारखान्यांना देण्यात आलेला मार्जिन मनी आणि साखर कारखान्यांमधील वजन काटे मॉनिटरिंगबाबतही सहकार विभागाने दक्ष राहावे, अशा सूचनाही त्यांनी आढावा बैठकीत दिल्या.





