Nagpur Crime : नागपूर हादरलं…! चारित्र्याच्या संशयावरून गर्लफ्रेंडची रॉडने निर्घृण हत्या

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चरित्राच्या संशयावरून तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात घालून गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या दाभा परिसरात ही घटना घडली आहे. हत्येची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
हेमलता वैद्य (३० वर्षे) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नागपूरतील गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर आरोपी अक्षय फरार झाला होता. पण पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याला अटक केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हेमलता या पतीच्या मृत्यूनंतर नागपूरमध्ये मुलीसोबत राहत होत्या. हेमलता यांचे अक्षय दाते या तरुणासोबत गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघेही वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील आहेत. पण अक्षय हेमलतावर नेहमी संशय घ्यायच्या. चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते.
नेहमीप्रमाणे अक्षय आणि हेमलता यांच्यामध्ये याच कारणावरून भांडण झाले. हेमलता बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये बसल्या होत्या. त्याचवेळी अक्षय त्याठिकाणी आला. त्यानेसोबत लोखंडी रॉड आणला होता. बसल्याठिकाणीच अक्षयने हेमलताला रॉडने मारहाण करण्यास सुरूवात केली. अक्षयने हेमलताच्या डोक्यावर रॉड मारला त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
दरम्यान, सोसायटीतील नागरिकांनी जखमी हेमलता यांना मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान हेमलताचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूमुळे पोरगी पोरकी झाली. गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी अक्षयला तत्काळ अटक केली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या नात्याचा शेवट अत्यंत हृदयद्रावक ठरला आहे.


