Donald Trump : “जॉर्जिया मेलोनी यांनी माझ्यासोबत फोटो काढण्यासाठी भीक मागितली होती..”; डोनाल्ड ट्रम्प यांचे खळबळजनक विधान, मेलोनी संतापल्या….
ट्रम्प यांचा दावा संपूर्णपणे बनावट आहे. इटली किंवा मी स्वतः कधीही भीक मागत नाही, असे त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

Giorgia Meloni | Donald Trump – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वैयक्तिक शेरेबाजीवरून इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी ट्रम्प यांच्यावर भडकल्या आहेत.
यामुळे इटलीचे परराष्ट्र मंत्री ऍन्टोनिओ ताजानी यांनी अचानक आपला या आठवड्याच्या अखेरीचा अमेरिकेचा नियोजित दौरा रद्द करून टाकला आहे. ट्रम्प यांनी मेलोनी यांच्याबद्दल केलेलीटिप्पणी मेलोनी यांच्यासाठी आणि संपूर्ण इटलीसाठी अनुचित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अलिकडेच झालेल्या जी-७ परिषदेदरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्याबरोबर फोटो काढण्यासाठी आपल्याकडे भीक मागितली होती, असा दावा ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता.
अमेरिकेशी दीर्घकाळापासून इटलीशी मित्रत्वाचे संबंध असल्याचे दर्शवण्यासाठी ट्रम्प यांनी ही बढाई मारल्याचे इटली सरकारने म्हटले आहे.
ट्रम्प यांचा दावा खोडून काढण्यासाठी मेलोनी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ट्रम्प यांचा दावा संपूर्णपणे बनावट आहे. इटली किंवा मी स्वतः कधीही भीक मागत नाही, असे त्यांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांना युक्रेनबद्दल प्रश्न विचारला गेला होता. पण ट्रम्प यांनी मेलोनी यांच्याबद्दल बोलायला सुरुवात केली होती. जी-७ परिषदेच्या समारोपाच्यावेळी ट्रम्प आणि मेलोनी एकत्र बोलतानाचे दिसले होते.
त्याच वेळी मेलोनी यांनी आपल्याकडे फोटोसाठी भीक मागितली. पण तसे करणे आपल्याला बंधनकारक नव्हते. मात्र आता आपल्याला मेलोनी यांच्याबद्दल दिलगिरी वाटते असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.
मात्र ट्रम्प यांच्या दाव्यावर त्वरित प्रतिक्रिया देणे गरजेचे असल्याचे मेलोनी म्हणाल्या. अमेरिकेच्या अध्यक्षांनी केलेला दावा बनावट आहे. या दाव्यामुळे मला धक्का बसला आहे.
ट्रम्प यांनी आपल्या देशाच्या मित्र देशाशी असे वर्तन का करावे, मला माहिती नाही. सरतेशेवटी हे काही पहिल्यांदा घडलेले नाही, असेही मेलोनी म्हणाल्या.






