Educational App: सविंदणे विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अॅपची भेट
Educational App: रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीकडून १ लाख ६३ हजार ६०० किमतीचे शैक्षणिक साहित्य;

शिरूर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सविंदणे येथील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसह सर्व विषय शिक्षकांना रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने शैक्षणिक अॅपचे वाटप करण्यात आले. राजन जांभळे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत तब्बल १ लाख ६३ हजार ६०० किमतीचे शैक्षणिक अॅप विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले.
दहावीची बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अभ्यासाची अधिक प्रभावी संधी मिळावी, तसेच विविध विषयांचा सराव, उजळणी आणि परीक्षेची तयारी अधिक सक्षमपणे करता यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
US Underwater Drone: इराणचा मोठा दावा! अमेरिकेचा दुसरा अंडरवॉटर ड्रोन पकडला?
कार्यक्रमावेळी राजन जांभळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक अॅपचा नियमित व योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत गुणवत्तावाढीसाठी हे शैक्षणिक अॅप निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणासाठी केल्यास विद्यार्थ्यांना अवघड संकल्पना समजून घेण्यास, सराव करण्यास आणि परीक्षेची तयारी अधिक परिणामकारकपणे करण्यास मदत होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक
या उपक्रमामुळे सविंदणे विद्यालयातील विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून अभ्यासाची अतिरिक्त सुविधा मिळाली असून, शिक्षकांनाही अध्यापन प्रक्रियेत आधुनिक साधनांचा वापर करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या या शैक्षणिक उपक्रमाचे विद्यालय परिसरातून कौतुक होत आहे.
कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य दिलीप नरवडे सर, विज्ञान शिक्षक विकास शिंदे सर, त्र्यंबक सानप सर, ग्रामस्थ, ज्युनिअर कॉलेजचे सचिव बाळासाहेब पडवळ, सुरेश अभंग (उपसरपंच, पारगाव पेठ), सुरेश भागडे यांच्यासह विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावणाऱ्या या उपक्रमामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी या शैक्षणिक अॅपचा प्रभावी उपयोग करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.





