Ghuman Yatra: संत नामदेव घुमान यात्रेचे १२ वे पर्व ; १५ नोव्हेंबरपासून पंजाब, हिमाचल, हरियाणा-दिल्ली दौरा
Ghuman Yatra:

Ghuman Yatra: महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, इतिहास, पर्यटन आणि संस्कृतीचा अनोखा अनुभव देणारी नानक साई फाऊंडेशनची नांदेड (हजूर साहिब) ते अमृतसर १२ वी ‘संत नामदेव घुमान यात्रा’ १५ ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेत पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली तसेच घुमान आणि कुरुक्षेत्र येथील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत.
नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते. आतापर्यंत ११ यात्रा यशस्वी झाल्या असून, यंदा यात्रेचे बारावे वर्ष आहे.
श्रद्धा, संस्कृती आणि पर्यटनाचा संगम Ghuman Yatra:
संत नामदेव महाराजांची कर्मभूमी असलेल्या पंजाबमधील घुमान येथे दर्शन घेणे हे यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. यासोबतच अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, वाघा सीमा, जालियनवाला बाग, आनंदपूर साहिब, फतेहगड साहिब, भटिंडा, चंदिगड, दिल्ली आणि कुरुक्षेत्र आदी ठिकाणांना भेटी दिल्या जाणार आहेत.
कुरुक्षेत्र येथील भद्रकाली माता मंदिर, रामतीर्थ, वाल्मिकी आश्रम, कार्तिक स्वामी मंदिर, तसेच हिमाचल प्रदेशातील नैना देवी शक्तीपीठ आणि भाक्रा-नांगल धरणाचाही दौऱ्यात समावेश आहे. पानिपतसह विविध ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची संधी भाविकांना मिळणार आहे. पंजाबमधील पर्जिया कलान गावात मुक्काम करून तेथील स्थानिक संस्कृती, परंपरा आणि पाहुणचार अनुभवता येणार आहे.
या यात्रेला लंगर साहिब गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा नरेंद्रसिंघजी आणि संत बाबा बलविंदरसिंघजी, संत बाबा कश्मीरसिंघजी भुरीवाले, संत बाबा गुरुदेवसिंघजी आनंदपूर साहिब, संत बाबा सतमानसिंघजी पिपली साहिब, संत बाबा बलबिरसिंघजी तसेच संत बाबा जोगासिंघजी कर्नालवाले यांचे आशीर्वाद लाभले आहेत.
चार हजारांहून अधिक भाविकांनी घेतला सहभाग Ghuman Yatra:
घुमान सद्भावना यात्रा केवळ धार्मिक स्थळांच्या दर्शनापुरती मर्यादित नसून, भक्ती, इतिहास, कला, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव देणारा उपक्रम आहे. त्यामुळे कुटुंबासह सहभागी होण्यासाठी ही यात्रा विशेष आकर्षण ठरत आहे. प्रवासादरम्यान पंजाब सरकार, विविध सामाजिक संस्था आणि संत मंडळींकडून भाविकांचे स्वागत केले जाते. त्यामुळे पंजाबच्या सांस्कृतिक परंपरा आणि पाहुणचाराचा जवळून अनुभव घेता येतो.
दरवर्षी सुमारे २४८ भाविक या उपक्रमात सहभागी होतात. मागील ११ यात्रांमध्ये चार हजारांहून अधिक मराठी भाविकांना पंजाब आणि हरियाणातील धार्मिक, ऐतिहासिक तसेच संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीचे दर्शन घडविण्यात आले आहे.
भक्ती, संस्कृती, राष्ट्रभक्ती आणि निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी तसेच पंजाबी पाहुणचाराचा आनंद लुटण्यासाठी ना नफा ना तोटा तत्त्वावर आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेत भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.





