Jabut News : घोड नदीला महापूर! बेल्हे-जेजुरी राज्यमार्ग पाण्याखाली, प्रशासनाकडून वाहतुकीसाठी रस्ता बंद

जांबुत : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातले आहे. दोन दिवसांपासून चालू असलेल्या मुसळधार पावसाने जवळपास महाराष्ट्र व्यापला असून पुणे जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली. दोन दिवस सतत जोरदार पडलेल्या पावसामुळे शिरूर-आंबेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या घोडनदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे बेल्हे-जेजुरी हा राज्यमार्ग पाण्याखाली गेला आहे. यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता चांडोह -लाखणगाव व पिंपरखेड ते देवगाव येथील शिरूर-आंबेगाव तालुक्याना जोडणारे पुल पाण्याखाली गेल्याने संबंधित रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहेत.
पुल पाण्याखाली गेल्याने पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता हे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे यांनी दिली आहेत. दोन मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून शनिवार (दि.२७) पासून शिरूर-आंबेगाव जुन्नर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावलेली आहे.
दोन दिवसापासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे घोडनदीसह मीना नदीला सुमारे ३५ हजारहून अधिक क्यूसेक पाण्याचा विसर्ग रविवारी (दि. २८) रोजी सकाळी आठ वाजता मीना व घोडनदीमध्ये सोडण्यात आला आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात पुढील दोन दिवसात पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
मुसळधार चालू असलेल्या पावसामुळे घोडनदीला मोठा पूर आला असल्याने बेल्हे -जेजुरी राज्यमार्गावरील चांडोह-लाखणगाव येथील पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक प्रशासनाकडून थांबविण्यात आलेली असून, या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी व मालवाहतूक वाहनांनी अन्य सुरक्षित मार्गाचा प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दोन दिवस चाललेल्या या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची संभाव्यता न करता येणार नसून शिरूर तालुक्यातील काठापुर खुर्द, पिंपरखेड, जांबुत, शरदवाडी, फाकटे, चांडोह या गावांतील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. अनेक ठिकाणी शेतीमध्ये पाण्याचे उपवळ निर्माण झाल्याने शेतातील उसासह तरकारी पिकांचे व जनावरांचा चारा खराब होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची शक्यता नाकारता येणार नसून याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
गेले दोन दिवस या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. अधिकचा पाऊस झाल्याने घोडनदीला मोठा पूर आला असून गावातील नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. महिलांनी नदीकाठी कपडे धुण्यासाठी जाणे टाळून शेतकऱ्यांनी देखील आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी तसेच नागरिकांनी या मार्गाने वाहतुक करणे टाळावे व काही मदत आवश्यक असल्यास तात्काळ गावचे ग्राममहसूल अधिकारी, सरपंच,पोलीस पाटील,कोतवाल यांचेशी संपर्क साधावा.
– सुग्रीव मुंढे, ग्राममहसूल अधिकारी, पिंपरखेड





