Tanmay Gajare: शिरूर तालुक्यातील जांबूत येथील सुपुत्र तन्मय झुंबर गाजरे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले आहे. तब्बल १२ वेळा पूर्व परीक्षा, ८ वेळा मुख्य परीक्षा आणि ३ वेळा मुलाखती असा प्रदीर्घ संघर्ष करत त्यांनी ‘वस्तू व सेवाकर’ (GST) विभागात सहाय्यक राज्यकर आयुक्त (वर्ग-१) पदाला गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. शैक्षणिक प्रवास – तन्मय यांचे प्राथमिक शिक्षण शिरूर तालुक्यातील आंबळे, जिल्हा परिषद शाळा रानमळा व आळकुटी (ता. पारनेर) येथे झाले. माध्यमिक शिक्षण विद्याधाम प्रशाला (शिरूर) आणि जय मल्हार हायस्कूल (जांबूत) येथे पूर्ण केले. त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे येथून तांत्रिक शिक्षण पूर्ण करून, एमआयटी (MIT) कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्रथम क्रमांकाने मिळवली. शालेय जीवनापासूनच त्यांनी शिष्यवृत्ती, MTSE आणि NTSE सारख्या परीक्षांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची भक्कम पायाभरणी केली होती. अप्पर क्लास-वन पर्यंतचा संघर्ष- इंजिनिअरिंगनंतर देशसेवेच्या ध्येयाने तन्मय यांनी ‘यूपीएससी’ अंतर्गत सीडीएस (CDS), टेरिटोरियल आर्मी आणि नेव्ही पायलट एन्ट्रीसाठी प्रयत्न केले. त्यांनी तब्बल ११ वेळा ‘एसएसबी’ (SSB) मुलाखती दिल्या, मात्र तिथे यश थोडक्यात हुकले. खचून न जाता त्यांनी आपला मोर्चा ‘एमपीएससी’कडे वळवला. STI ते आयुक्त : ‘कम्बाईन २०२१’ परीक्षेत त्यांनी राज्यात ४८ व्या क्रमांकासह ‘स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर’ (STI) पद मिळवले होते. २०२३ मध्ये या पदावर रुजू झाल्यानंतरही त्यांनी अभ्यासातील सातत्य सोडले नाही. नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यसेवा परीक्षेत प्रगती करत थेट ‘वर्ग-१’ पदापर्यंत झेप घेतली. आपल्या या यशाचे श्रेय तन्मय यांनी वडील तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक झुंबर गाजरे, आई उज्वला गाजरे आणि आपल्या गुरूंना दिले आहे. अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास ध्येय गाठता येते, हेच तन्मय यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.