घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला न्यायालयाकडून जामीन मंजूर

घाटकोपर : घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटना प्रकरणात अटकेत असलेला इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. भिंडे याने अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच, अटक बेकायदा ठरवून तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली होती.
त्यानंतर, भिंडे याने पुन्हा एकदा सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका केली होती. सत्र न्यायालयाने शनिवारी त्याच्या जामीन अर्जावर निर्णय देताना त्याला जामीन मंजूर केला. फलक दुर्घटना हे प्राक्तन होते. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असा दावा भिंडे याने जामिनाची मागणी करताना केला होता.
काय आहे प्रकरण?
मार्च मध्ये घाटकोपर येथील एका पेट्रोल पंपावर 100 फूट उंच आणि 250 टन वजनाचे लोखंडी होर्डिंग पडले होते. यावेळी या महाकाय होर्डिंगखाली काही कार, दुचाकी आणि पादचारी अडकले होते. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 74 जण जखमी झाले होते.





