Ghabadkund Movie: आगामी मराठी चित्रपट ‘घबाडकुंड’साठी पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे तब्बल १२ हजार स्क्वेअर फुटांवर भव्यदिव्य सेट उभारण्यात आला आहे. या सेटमध्ये पाण्याची कुंड, खोल विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा व गुप्त मार्ग यांचा समावेश असून रहस्यमय वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘घबाडकुंड’ हा रहस्य-थ्रिलरपट असून यात अॅक्शन, थरार, विनोद आणि नातेसंबंधांची गुंतागुंत एकत्र पाहायला मिळणार आहे. अचानक धनलाभ, लॉटरी लागल्यासारखा सुदैवाचा खेळ आणि त्याच्या शोधातील संघर्ष याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. ‘अल्याड पल्याड’च्या यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांचा हा नवा बिगबजेट चित्रपट आहे. निर्माते रसिक कदम असून सहनिर्मिती स्मिता पायगुडे-अंजुटे यांची आहे. चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर आणि साहिल अनलदेवर यांसारखे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी संजय नवगिरे आणि अक्षय धरमपाल यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी, संकलन सौमित्र धाराशिवकर यांचे असून कार्यकारी निर्माते आकाश जाधव आहेत. अॅक्शन दृश्यांसाठी साऊथचे नामवंत फाईट मास्टर कार्तिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ‘घबाडकुंड’ हा चित्रपट फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभव देणारा हा बिगबजेट चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे.