Nagar : निवडणुकीत यश मिळविण्यासाठी कामाला लागा – महसूलमंत्री विखे

संगमनेर : आ. खताळ यांच्या विजयाने तालुक्यात परिवर्तन होवू शकते, हा विश्वास विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वांना मिळाला. भविष्यात अशाच संघटीतपणे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायचे असल्याने त्यादृष्टीने तयारी सुरू करा, असा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.
जलसंपदामंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे येऊन दर्शन घेतले. यानिमित्ताने महायुतीचे पदाधिकारी आणि विखे समर्थक कार्यकर्त्यांनी स्वागत केले.आ.अमोल खताळ, जेष्ठनेते बापूसाहेब गुळवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा सहकारी बॅकेचे व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, निवृत्त सनदी आधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्यासह जेष्ठ आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ आपण निझर्णेश्वराच्या येथूनच केला होता. परिवर्तनाची सुरुवात ही विधानसभा निवडणूकीपासून सुरू झाली आहे. तालुक्यातील जनतेने महायुतीवर विश्वास ठेवून आ.अमोल खताळ यांना एतिहासिक विजय मिळवून दिला. विधानसभेतील या विजयामुळे तालुक्यात परिवर्तन होवू शकते, हा विश्वास आपल्या सर्वांना मिळाला आहे. भविष्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही येणार आहेत. या निवडणुकीतही आपल्याला तालुक्यात परिवर्तन घडवायचे आहे. विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणेच संघटीतपणे या निवडणुकीत यश मिळवायचे आहे. त्यादृष्टीने तयार सुरू करा, असा संदेशही त्यांनी या निमित्ताने दिला.
भाजपाच्या नेत्यांनी आपल्याकडे आता जलसंपदा विभागाचा कार्यभार सोपविला आहे. यापूर्वी निळवंडे धरणाचे पाणी जिरायती भागाला मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न झाला पण आता एवढ्यावरच आपल्याला थांबायचे नाही. या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवून हा भाग दुष्काळमुक्त कसा होईल हाच आपला प्रयत्न असणार आहे. गोदावरी आणि कृष्णा हे सर्वात मोठे खोरे आहे. या भागात येणारे सिंचनाचे प्रकल्प निर्धारित वेळेत मार्गी लावण्यासाठी आराखडा तयार करायचा आहे. तशा सूचनाही आपण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
आ.अमोल खताळ यांनी तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचे भाग्य हे विखे पाटील यांना मिळाले आहे. यापूर्वीही निळवंडे धरणाचे पाणी मिळवून देऊन त्यांनी संगमनेर तालुक्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. भविष्यात आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासाची गंगा सुध्दा आपल्याला पुढे घेवून जायची असल्याचे त्यांनी सांगितले. जलसंपदा मंत्री पदावर निवड झाल्याबद्दल ना.विखे पाटील यांचा तसेच जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांचा नागरी सत्कार ५ जानेवारी रोजी संगमनेर तालुक्याच्या वतीने आयोजित केल्याची माहिती दिली.





