पिंपरी | फक्त एक रुपयात मिळणार पीक विमा

पवनानगर (वार्ताहर) – पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार खरीप हंगाम 2024-25 साठी मावळ तालुक्यात यावर्षी फक्त भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांचा समावेश करण्यात आला असून विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत 15 जुलै 2024 देण्यात आलेली आहे.
अवघे पाचच दिवस शिल्लक राहिले असून आता फक्त एक रुपयात पीक विमा मिळणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा अवश्य काढावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
शेतक-यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि. ३० मे २०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली होती .
राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ एक रुपयांत पिक विमा काढता येईल व याची उर्वरित रक्कम आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली, त्यानंतर एक रुपयात पीक विमा सुरु करण्यात आला.
राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे. असे कृषी सहाय्यक अधिकारी विकास गोसावी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, सोसायटी सचिव यांच्याशी पीक विमा योजनेत सहभागासाठी संपर्क साधावा. कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचारी अधिकारी गावामध्ये प्रचार प्रसिद्धी, माहिती द्याचे काम करत आहेत. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे मंडळ अधिकारी काळेकॉलनी प्रशांत डहाळे व विकास गोसावी यांनी सांगितले
योजनेची वैशिष्ट्य
कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे. पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना अधिसूचित केलेल्या पिकांसाठी व केवळ अधिसूचित क्षेत्रासाठी असेल यातील जोखीम स्तर ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे.
जोखमीच्या बाबी
पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, पिकाच्या हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जसे की, पूर, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास. पीक काढणीनंतर नुकसान झाल्यास पंचनामा करुन नुकसान भरपाईस पात्र जसे की भात पेंढया सुकवणीस ठेवल्यास त्या बिगर मौसमी पावसाने होणारे नुकसान.
योजनेत समाविष्ट पिके :- यामध्ये अन्न धान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल
कागद पत्रे
ज्या क्षेत्रावरील पिकाचा विमा काढावयाचा आहे त्या शेत जमिनीचा 7/12 व 8 अ, स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड , बँक खाते क्रमांक ई.
ई पीक पाहणी
शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी अंतेर्गत आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यात तफावत आढळल्यास, ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.
योजनेत सहभागी होण्यासाठी काय कराल
ज्या बँकेत किसान क्रेडिट कार्ड खाते आहे किंवा ज्या बँकेकडून पीक कर्ज घेतले आहे त्या बँक शाखेत योजनेत सहभागी होणार असल्याचे घोषणा पत्र जमा करावे व त्याची पोहोच पावती प्राप्त करून घ्यावी.
योजनेत इछुक बिगर कर्जदार शेतकरी हे विमा प्रस्तावाचे अर्ज भरून व्यापारी बँक/ प्रादेशिक ग्रामीण बँक/ प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्था / आपले सरकार सेवा केंद्र (CSC) / अधिकृत विमा प्रतीनिधी यांच्या कडे रकमेसह सादर करतील. पीक विमा भरण्यासाठी website – https://pmfby.gov.in/farmerRegistrationForm





