Diwali Skin Care Tips: दिवाळीत मेकअपशिवायही चेहऱ्यावर दिसेल ग्लो! स्किन केअरसाठी लक्षात ठेवा ‘या’ ७ गोष्टी
Diwali Skin Care Tips दिवसभर बाहेर फिरताना चेहऱ्यावर धूळ, माती, घाम आणि तेल जमा होते. यामुळे त्वचा निस्तेज दिसू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार माइल्ड क्लींजरचा वापर करा. मात्र, वारंवार फेसवॉश करण्याची सवय टाळा. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.

Diwali Skin Care Tips: दिवाळी म्हटलं की नवीन कपडे, दागिने, मेकअप आणि सुंदर दिसण्याची तयारी सुरू होते. सणाच्या दिवशी आपला चेहरा फ्रेश आणि चमकदार दिसावा, असं अनेकांना वाटतं. मात्र, सणाच्या तयारीतील धावपळ, कामाचा ताण, अपुरी झोप आणि बदललेली दिनचर्या याचा परिणाम त्वचेवरही होतो. त्यामुळे चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू शकतो. अशावेळी शेवटच्या क्षणी महागडे फेशियल किंवा ब्यूटी ट्रीटमेंट करण्याची गरज नाही. दिवाळीच्या काही दिवस आधीपासून त्वचेची योग्य काळजी घेतल्यास चेहऱ्याचा नैसर्गिक तजेला टिकवता येतो. यासाठी आपल्या रोजच्या स्किन केअर रुटीनमध्ये काही सोप्या गोष्टींचा समावेश करा. जाणून घेऊया चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठीच्या ७ खास टिप्स…
१. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी माइल्ड क्लींजर वापरा
दिवसभर बाहेर फिरताना चेहऱ्यावर धूळ, माती, घाम आणि तेल जमा होते. यामुळे त्वचा निस्तेज दिसू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. यासाठी आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार माइल्ड क्लींजरचा वापर करा. मात्र, वारंवार फेसवॉश करण्याची सवय टाळा. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो.
२. मॉइश्चरायझर लावायला विसरू नका
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी त्वचेतील ओलावा महत्त्वाचा असतो. त्यामुळे चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावण्याची सवय लावा. त्वचा किंचित ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावल्यास ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. आपल्या त्वचेच्या गरजेनुसार ग्लिसरीन, हायलुरॉनिक अॅसिड किंवा सेरामाइड्स असलेले मॉइश्चरायझर निवडू शकता.
३. सनस्क्रीनचा वापर नक्की करा
अनेक जण केवळ उन्हाळ्यातच सनस्क्रीन लावतात. मात्र, त्वचेचे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन रोज वापरणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना एसपीएफ ३० किंवा त्यापेक्षा जास्त एसपीएफ असलेले ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा. बाहेर जास्त वेळ राहणार असाल तर दर दोन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा. घाम आल्यास किंवा चेहरा धुतल्यानंतरही त्याचा पुन्हा वापर करा.
Diwali Skin Care
४. डेड स्किन काढण्यासाठी एक्सफोलिएशन करा
त्वचेवर मृत पेशी जमा झाल्यामुळे चेहरा निस्तेज दिसू शकतो. अशावेळी सौम्य एक्सफोलिएशन उपयोगी ठरू शकते. आठवड्यातून एकदा त्वचेला अनुकूल असलेल्या माइल्ड एक्सफोलिएंटचा वापर करू शकता. मात्र, संवेदनशील त्वचा असल्यास एक्सफोलिएशन टाळणे चांगले. तसेच दिवाळीच्या अगदी एक-दोन दिवस आधी नवीन केमिकल पील किंवा स्ट्राँग स्क्रब वापरण्याची चूक करू नका. यामुळे त्वचेवर जळजळ किंवा लालसरपणा येऊ शकतो.
५. शीट मास्कने त्वचेला द्या हायड्रेशन
दिवाळीपूर्वी चेहऱ्याला फ्रेश लुक देण्यासाठी हायड्रेटिंग शीट मास्कचा वापर करू शकता. हायलुरॉनिक अॅसिड किंवा ग्लिसरीन असलेले शीट मास्क त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामुळे त्वचा ताजीतवानी दिसू शकते. मात्र, शीट मास्क चेहऱ्यावर किती वेळ ठेवायचा, याबाबत पॅकेटवरील सूचना वाचा. मास्क रात्रभर चेहऱ्यावर ठेवू नका.
६. डोळ्यांचीही घ्या विशेष काळजी
सणाच्या तयारीत अनेकदा झोप पूर्ण होत नाही. याचा परिणाम डोळ्यांभोवती दिसू शकतो. डोळ्यांखाली सूज येणे आणि थकवा जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात. यासाठी स्वच्छ थंड कपड्याने काही मिनिटे डोळ्यांच्या आसपास हलकी शेक द्या. तसेच पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांच्या आसपासच्या नाजूक त्वचेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
७. आहार आणि झोपेकडे दुर्लक्ष करू नका
केवळ बाहेरून त्वचेची काळजी घेऊन नैसर्गिक तजेला टिकवता येत नाही. त्यासाठी शरीराचीही काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्या. आहारात हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, प्रथिने आणि सुका मेवा यांचा समावेश करा. यासोबतच दररोज सात ते नऊ तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप आणि संतुलित आहारामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.
दिवाळीपूर्वी ही काळजी घ्या!
दिवाळीच्या अगदी शेवटच्या दिवशी त्वचेवर वेगवेगळे प्रयोग करण्यापेक्षा आधीपासूनच नियमित स्किन केअर रुटीन फॉलो करा. नवीन उत्पादने वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. त्वचेवर आधीपासून जळजळ किंवा अॅलर्जी असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, सुंदर दिसण्यासाठी महागड्या ट्रीटमेंटपेक्षा त्वचेची नियमित आणि योग्य काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे.





