जर्मनीतील पूरातील मृतांची संख्या 180 वर; आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी उघड

बर्लिन – जर्मनीतील पूरस्थिती अतिगंभीर बनली असताना या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे अधिकारी मात्र समर्थनच करत आहेत.
आतापर्यंत पश्चिम युरोपातील या पूरामध्ये 180 जणांचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीतून आपल्याला एक धडा शिकायला मिळाला असल्याचे मात्र जर्मन अधिकाऱ्यांनी मान्य केले.
पश्चिम जर्मनी, पूर्व बेल्जियम आणि नेदरलॅन्डमधील पूराचे पाणी आता ओसरले असले तरी पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या भागाची फेरउभारणी आणि पुनर्वसनाचे काम अजूनही बाकी आहे.
अतिजोरदार पावसांमुळे गेल्या आठवडयात या भागातील अनेक लहान मोठ्या नद्यांना पूर आला होता. या अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र हा इशारा अनेक लोकांनी गांभीर्याने घेतलेला नव्हता. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नक्की काय चुकले, याचा आढावा नंतर घेतला जाईल, असे जर्मनीचे अर्थमंत्री पीटर अल्टमेयर यांनी सांगितले.
पावसापूर्वी किमान 150 वेळा संभाव्य अतिवृष्टचे इशारे वेगवेगळ्या ऍप आणि प्रसिद्धी माध्यमांद्वारे दिले गेले होते, असे जर्मनीतील नागरी संरक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले. धोक्याचे सायरनही वाजवले गेले होते. मात्र ते काही ठिकाण ऐकूही गेले नव्हते, असेही समजते आहे. यासर्व प्रकारामुळे आपत्त व्यवस्थापनामध्ये मोठी त्रुटी राहून गेल्याचे आता लक्षात येते आहे.





