मुंबई – जागतिक फुटबॉलमध्ये अत्यंत नावाजलेले जर्मनीचे प्रख्यात गोलकीपर ऑलिव्हर कान यांनी भारतात अकादमी स्थापन केली आहे. त्याच अंतर्गत भारतात फुटबॉलच्या चाहत्यांची संख्या एकीकडे वाढत असल्यामुळे भारतीय फुटबॉलची प्रगती हाच आपली अकादमीचा मुख्य उद्देश असल्याचे कान यांनी म्हटले आहे.
भारतात इतक्या स्पर्धा होतात, तसेच भारतीय फुटबॉलपटू विशेषतः कर्णधार सुनील छेत्री जागतिक स्तरावर लोकप्रीयता मिळवतात मात्र, खेळाचा स्तर उंचावत नाही. त्यामुळेच ही अकादमी भारतातील युवा खेळाडूंना आवश्यक त्या सर्व अत्याधूनीक सुविधा पुरवणार असून त्यांना खुद्द कान यांच्यासह जगातील अनेक नामवंत खेळाडूंकडून मार्गदर्शनही मिळवून देणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून जगभरातील अनेक फुटबॉल क्लबनी भारतातील फउटबॉल चाहत्यांची वाढती संख्या पाहून एक शाखा भारतातही सुरू केली आहे. त्यातच आता कान यांच्या अकादमीची भर पडत आहे. या अकादमीच्या माध्यमातून देशभरातील नवी गुणवत्ता हेरली जाणार आहे व त्यांना या अकादमीत सध्याच्या आधूनिक फुटबॉलचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच स्वतः कान हे प्रशिक्षण देण्यासाठी सातत्याने भारतात येणार आहेत.
भारतीय फुटबॉलचे नियंत्रण असलेली राष्ट्रीय संघटना तसेच विविध राज्य संघटनांबाबत यासाठी बोलणी सुरु असून जे कार्य क्रिकेटपटू घडवण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी करत आहे. त्याच धर्तिवर फुटबॉलचाही सर्वांगिण विकास व्हावा याचे प्रयत्न कान यांच्या अकादमीकडून केले जाणार आहे.
गोलकीपर घडवण्यावरही राहणार भर
कान हे स्वतः एक जगभरात नावाजले गेलेले गोलकीपर म्हणून प्रसिद्ध होते. जर्मनी संघाला त्यांनी विविध स्पर्धांमध्ये केवळ आपल्या अफलातून गोलरक्षणाच्या जोरावर सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे येत्या काळात भारतातही अत्यंत अव्वल गोलकीपर तयार व्हावेत यासाठी या अकादमीत जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे.