ब्रिटनवरून आलेल्या “पॉझिटिव्ह’ रुग्णांचे जिनॉम सिक्वेन्स तपासणार

नवी दिल्ली – दिनांक 9 ते 22 डिसेंबरदरम्यान ब्रिटनमधून भारतात आलेल्या आणि कोविड चाचणीत “पॉझिटिव्ह’ आढळलेल्या रुग्णांचे नमुने जिनॉम सिक्वेन्स तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. ब्रिटनमध्ये अलिकडच्या काळात आढळलेल्या करोनाच्या नवीन विषाणूचे अंश तपासण्यासाठी या रुग्णांच्या नमुन्यांमधील “जिनॉम सिक्वेन्स’तपासण्यात येणार आहेत.
तर इतर प्रवाशांवरही राज्य आणि जिल्हा प्रशासनाकडून देखरेख केली जाणार आहे. ब्रिटनवरून आल्याच्या 5 आणि 10 दिवसांनंतर त्या रुग्णांमध्ये करोनाच्या संसर्गाची कोणतीही लक्ष्णे आढळली नसली तरी “आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रवाशांचीही चाचणी केली जाणार आहे.
दिनांक 9 ते 22 डिसेंबर दरम्यानच्या 14 दिवसात विदेशातून आलेल्या सर्वच प्रवाशांची तपासणी केली जाणार असून त्या प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे अथवा चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचेही जिनॉम सिक्वेन्स तपासले जाणार आहे. ब्रिटनमध्ये सापडलेला नवीन विषाणू डेन्मार्क, नेदरलॅन्ड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वीत्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबेनान आणि सिंगापूर आदी देशांमध्ये सापडले आहेत.
करोना विषाणूचा नवीन प्रकार शोधण्यासाठी केंद्राने दहा प्रादेशिक प्रयोगशाळा निश्चित केल्या आहेत. तिथे राज्यांकडून कोविड-19 पॉझिटिव्ह नमुने पाठवले जाऊ शकणार आहे.





