“कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पिढ्या बरबाद…”; परभणीतील घटनेवरून सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Sushma Andhare | परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.
परंतु, या आदेशाला न जुमानता काल शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. या घटनेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
ज्यात त्यांनी म्हंटले आहे की, “परभणीमध्ये काल संध्याकाळपासून कोंबिंग ऑपरेशन सुरू असल्याचे समजते. मुळात 20 तारखेला निवडणुकांचे निकाल लागले. त्यानंतर 24 तारखेला काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत दहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला आहे. मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेला नाही. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावा आणि कुणी हाताळावा, हा प्रश्न निर्माण झालेला आहे.”
पुढे ते म्हणाले, “कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांचे आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल, तर निश्चितपणे हा अत्यंत निंदनीय आणि निषिद्ध प्रकार आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्याऐवजी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अशा पिढया उध्वस्त करणे आणि बरबाद करणे, याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो,” असेही सुषमा अंधारे यांनी केली आहे.
तणाव निर्माण होऊ शकतो हे माहीत असतानाही गलथानपणा करणारे पोलीस आणि स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पिढ्या बरबाद करणारे सरकार यांचा जाहीर निषेध! @Dev_Fadnavis @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm #परभणी_महापुरुष_विटंबना pic.twitter.com/YG7UKWGSy8
— SushmaTai Andhare (@andharesushama) December 12, 2024
नेमकं काय घडलं?
दरम्यान, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची काच मनोरुग्णाने फोडली होती. त्यावरून संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांसमक्ष या व्यक्तीला अमानुष मारहाण केली. पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्याचा जीव वाचला. सोमवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली होती. सोपान दत्तराव पवार (45) असे आरोपीचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला अटक करून रुग्णालयात दाखल केले.
परभणीमध्ये आज बुधवारी आंबेडकरी अनुयायांकडून बंद पुकारण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते. परंतु, या आदेशाला न जुमानता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता.
परभणी शहरातील काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. अनेक ठिकाणी बॅनरची तोडफोड करून रस्त्यावर पेटून देण्यात आले होते, त्यामुळे पोलिसांकडून परभणीतील रस्त्यावर मार्च काढण्यात आले होते.
हेही वाचा:




