Black Friday Sale: ब्लॅक फ्रायडे सेलला Gen-Z चा ठेंगा! शॉपिंगऐवजी ‘नो-बाय चॅलेंज’ची क्रेझ, नेमका काय आहे हा ट्रेंड?
Black Friday Sale या चॅलेंजमध्ये घरभाडे, किराणा, प्रवास, औषधे आणि रोजच्या गरजांसाठी पैसे खर्च करता येतात. मात्र, केवळ ट्रेंडमध्ये आहे म्हणून एखादा ड्रेस खरेदी करणे, कपाटात आधीच भरपूर कपडे असताना आणखी कपडे घेणे किंवा घरात जागा नसतानाही सजावटीच्या वस्तू खरेदी करणे टाळले जाते. थोडक्यात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करणे आणि अनावश्यक खरेदीला ब्रेक लावणे, हा या चॅलेंजचा मुख्य उद्देश आहे.

Black Friday Sale: नोव्हेंबर महिना संपत आला की जगभरात ब्लॅक फ्रायडे सेलची चर्चा सुरू होते. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर मोठमोठ्या डिस्काउंटच्या जाहिराती दिसू लागतात. कुठे ५० टक्के, तर कुठे ८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. आकर्षक ऑफर्स, फ्लॅश सेल आणि मर्यादित वेळेच्या डील्सच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित केले जाते. मात्र, यंदा या सेलमध्ये Gen-Z म्हणजेच तरुण पिढीचा दृष्टिकोन काहीसा वेगळा दिसत आहे. भरमसाठ खरेदी करण्याऐवजी तरुणाई ‘नो-बाय चॅलेंज’ला पसंती देत आहे. नेमके काय आहे हे चॅलेंज आणि तरुणांमध्ये त्याची क्रेझ का वाढत आहे, जाणून घेऊया.
काय आहे ‘नो-बाय चॅलेंज’? (Black Friday Sale)
‘नो-बाय चॅलेंज’ म्हणजे ठरावीक कालावधीसाठी अनावश्यक खरेदी टाळणे. या चॅलेंजमध्ये प्रत्येक खर्चावर बंदी घातली जात नाही. तर आपल्या गरजा आणि हौस यामधील फरक ओळखून पैसे खर्च करण्यावर भर दिला जातो.
या चॅलेंजमध्ये घरभाडे, किराणा, प्रवास, औषधे आणि रोजच्या गरजांसाठी पैसे खर्च करता येतात. मात्र, केवळ ट्रेंडमध्ये आहे म्हणून एखादा ड्रेस खरेदी करणे, कपाटात आधीच भरपूर कपडे असताना आणखी कपडे घेणे किंवा घरात जागा नसतानाही सजावटीच्या वस्तू खरेदी करणे टाळले जाते. थोडक्यात, गरजेच्या वस्तूंवर खर्च करणे आणि अनावश्यक खरेदीला ब्रेक लावणे, हा या चॅलेंजचा मुख्य उद्देश आहे.
Gen-Z अनावश्यक खरेदी का टाळत आहे? (Black Friday Sale)
आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन शॉपिंग करणे खूप सोपे झाले आहे. एका क्लिकवर वस्तू ऑर्डर करता येतात. UPI च्या माध्यमातून काही सेकंदांत पैसेही भरता येतात. त्यामुळे छोट्या-छोट्या खरेदीवर किती पैसे खर्च होतात, याचा अनेकदा अंदाज येत नाही.
महिन्याच्या सुरुवातीला कपडे, शूज, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंवर पैसे खर्च केले जातात. मात्र, महिन्याच्या शेवटी बँक बॅलन्स कमी झाल्याचे लक्षात येते. त्यामुळे तरुणांमध्ये आता आर्थिक नियोजन आणि बचतीबाबत जागरूकता वाढताना दिसत आहे. वाढती महागाई आणि भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेता, केवळ दिखाव्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा बचत करणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण होत आहे.

Black Friday 2026
फेक डिस्काउंटला Gen-Z चा नकार (Black Friday Sale)
ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये मोठमोठ्या डिस्काउंटच्या जाहिराती केल्या जातात. मात्र, प्रत्येक ऑफर खरोखर फायदेशीर असतेच असे नाही. काही वेळा उत्पादनाची किंमत आधी वाढवून नंतर मोठी सूट दिल्याचा आभास निर्माण केला जातो, अशी ग्राहकांची तक्रार असते. ‘ऑफर संपायला काही मिनिटे बाकी’, ‘फक्त दोन वस्तू शिल्लक’ अशा संदेशांमुळे ग्राहकांवर तातडीने खरेदी करण्याचा दबाव निर्माण होतो. (Black Friday Sale)
मात्र, सोशल मीडियामुळे आता उत्पादनांच्या किमतींची तुलना करणे आणि ग्राहकांचे रिव्ह्यू तपासणे सोपे झाले आहे. त्यामुळे केवळ डिस्काउंट दिसतोय म्हणून खरेदी करण्याऐवजी वस्तूची गरज आहे का, याचा विचार केला जात आहे. (Black Friday Sale)
शॉपिंग हॉलपेक्षा मिनिमलिझमला पसंती (Black Friday Sale)
काही काळापूर्वी सोशल मीडियावर मोठमोठ्या शॉपिंग बॅग्स आणि महागड्या वस्तू दाखवणारे ‘शॉपिंग हॉल’ व्हिडीओ लोकप्रिय होते. मात्र, आता त्याऐवजी मिनिमलिझम म्हणजेच कमी वस्तूंमध्ये समाधान शोधण्याची संकल्पना चर्चेत आहे.
कंटाळा किंवा ताण दूर करण्यासाठी अनेकदा ऑनलाइन शॉपिंग केली जाते. वस्तू मिळाल्यानंतर काही दिवसांतच तिचे आकर्षण कमी होते. परिणामी घरात न वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा साठा वाढतो आणि खर्च केल्याची खंतही वाटते. त्यामुळे उपलब्ध वस्तूंचा अधिकाधिक वापर करणे, अनावश्यक खरेदी टाळणे आणि पैशांची बचत करणे याला तरुणाई महत्त्व देत आहे.
नो-बाय चॅलेंज म्हणजे कंजूषपणा नव्हे!
‘नो-बाय चॅलेंज’ हा केवळ खरेदी न करण्याचा ट्रेंड नाही. तर आपल्या खर्चाच्या सवयी समजून घेण्याची आणि आर्थिकदृष्ट्या अधिक जागरूक होण्याची ही एक संधी आहे. ब्लॅक फ्रायडेच्या आकर्षक ऑफर्सच्या काळात Gen-Z चा हा बदलता दृष्टिकोन लक्षवेधी ठरत आहे. कारण आता महागड्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे अधिक महत्त्वाचे मानले जात आहे. प्रत्येक ऑफरचा फायदा घेण्यापेक्षा आपल्या गरजेनुसार खर्च करणे आणि भविष्यासाठी पैसे वाचवणे, हाच खरा स्मार्टनेस आहे!


