पुण्यात ‘जीबीएस’ आजार वाढतोय; महापालिकेने चाचण्यांची सुविधा करावी – मंजूषा नागपूरे

पुणे – शहरात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरात या साथीचे रूग्ण मोठया प्रमाणात आहेत. तर या आजाराच्या निदान होण्यासाठीच्या चाचण्या महाग आहेत. ही बाब लक्षात घेता संशयित रूग्णांच्या चाचण्यांचा खर्च महापालिकेने करावा, अशी मागणी माजी नगरसेविका मंजूषा नागपूरे यांनी केली आहे.
नागपूरे यांनी या मागणीचे पत्र महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डाॅ. निना बोरूडे यांना दिले आहे. तसेच, या आजाराच्या रूग्णांच्या उपचारासाठी महापालिकेने व्यवस्था करावी, अशी मागणीही नागपूरे यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या साथीचे रूग्ण पुण्यात वाढत आहेत. तसेच, प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरात सर्वाधिक संशयित रूग्ण असून दूषीत पाण्यामुळे हा आजार पसरतो. ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याची मागणीही नागपूरे यांनी केली आहे.





