अन्नासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या लोकांवर इस्रायली सैन्याचा गोळीबार ; ६७ पॅलेस्टिनींचा मृत्यू

Gaza Israeli Attack। कतारमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धबंदीच्या चर्चेदरम्यान गाझामधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. रविवारी उत्तर गाझामध्ये इस्रायली गोळीबारात संयुक्त राष्ट्रांच्या मदत साहित्याची वाट पाहणाऱ्या ६७ पॅलेस्टिनींना आपला जीव गमवावा लागला. गाझा आरोग्य मंत्रालयाने या घटनेची पुष्टी करत मृतांमध्ये महिला आणि मुलेही असल्याचे म्हटले आहे.
इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे की, त्यांच्या सैनिकांनी धोक्याच्या भीतीने चेतावणीच्या गोळीबार केला. मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकना लक्ष्य करण्यात आले नव्हते आणि मृतांची संख्या अतिशयोक्तीपूर्ण दाखवली जात आहे.
उपासमारीचा धोका वाढला Gaza Israeli Attack।
संयुक्त राष्ट्रसंघ एजन्सी WFP ने म्हटले आहे की, गाझामध्ये प्रवेश करताच त्यांच्या २५ ट्रकच्या ताफ्यावर भुकेलेला जमाव जमला होता. तेव्हाच गोळीबार झाला. त्याच वेळी, गाझामध्ये राहणाऱ्या लोकांनी सांगितले की आता पीठासारख्या मूलभूत गोष्टी मिळणे अशक्य झाले आहे. नोप लिओ यांनी गाझामधील कॅथोलिक चर्चवरील हल्ल्याचा निषेध केला आहे, ज्यामध्ये तीन लोक मारले गेले. त्यांनी ‘युद्धाची क्रूरता’ संपवण्याचे आवाहन केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ आणि गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने इशारा दिला आहे की गाझा उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आतापर्यंत ७१ मुले कुपोषणामुळे मृत्युमुखी पडली आहेत आणि ६० हजार मुले कुपोषणाच्या लक्षणांनी ग्रस्त आहेत. गेल्या २४ तासांत १८ लोक उपासमारीने मृत्युमुखी पडले आहेत. रविवारी, गाझाच्या देईर अल-बलाहमध्ये सैन्याने पत्रके टाकली, ज्यात लोकांना हा परिसर रिकामा करण्याचा इशारा देण्यात आला होता.
आतापर्यंत ५८ हजारांहून अधिक मृत्यू
गाझा आरोग्य मंत्रालयाच्या मते, या संघर्षात आतापर्यंत ५८,००० हून अधिक पॅलेस्टिनींनी आपले प्राण गमावले आहेत आणि लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत. गाझा मानवतावादी आपत्तीचा सामना करत आहे.
युद्धबंदी करारावरील चर्चा अपूर्ण Gaza Israeli Attack।
६० दिवसांच्या युद्धबंदी आणि ओलिस करारावर कतारमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात चर्चा सुरू आहे, परंतु आतापर्यंत कोणतेही यश मिळालेले नाही. रविवारी गाझा सीमेजवळ अनेक स्फोट ऐकू आले आणि इस्रायली लष्कराने सांगितले की ते त्यांचे लष्करी कारवाया सुरू ठेवत आहे.





