मावळ, – मावळ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला आज, शनिवारी (दि.२३) तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मुख्य निवडणूक केंद्रामध्ये सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. एकूण २९ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पूर्ण होणार आहे. तर अंदाजे दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक निकाल जाहीर होइल, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली. मतमोजणीसाठी एकूण १४ टेबल, पोस्टल मतांच्या मोजणीसाठी दोन टेबल आणि सैनिकांच्या मतमोजणीसाठी एक टेबल लावण्यात येणार आहे. पोस्टल मतमोजणीने मतमोजणीची सुरुवात होणार आहे. तर १४ टेबलवर २९ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे. एका फेरीसाठी अंदाजे १५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात यंदा विक्रमी ७२.५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदारसंघातील एकूण ३ लाख ८६ हजार १७२ मतदारांपैकी २ लाख ८० हजार ३१९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १ लाख ४४ हजार २१४ पुरुष, १ लाख ३६ हजार १०२ महिला तसेच इतर ३ मतदारांचा समावेश आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत एकूण मतदारसंख्या ३ लाख ४८ हजार ४६२ होती. त्यापैकी २ लाख ४७ हजार ९६३ मतदारांनी मतदान केले होते. त्यावर्षी म्हणजे २०१९ साली ७१.१६ टक्के मतदान झाले होते. यावर्षी मतदान प्रथमच ७२ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. तळेगावात होणार मतमोजणी मावळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शनिवारी (दि.२३) तळेगाव दाभाडे येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील मुख्य निवडणूक केंद्रामध्ये होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरु होईल. मतमोजणीसाठी १४ टेबल, पोस्टल मतांच्या मोजणीसाठी २ टेबल व सैनिकांच्या मतमोजणीसाठी एक टेबल असणार आहे. पोस्टल मतमोजणीने मतमोजणीला सुरुवात होणार असून १४ टेबलवर २९ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली. २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी मावळ विधानसभा निवडणूक – २००९ बाळा भेगडे (भाजपा) – ८३,१५८ मते (मताधिक्य १४,३१८) बापूसाहेब भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – ६८,८४० मते मावळ विधानसभा निवडणूक – २०१४ बाळा भेगडे (भाजपा) – ९५,३१९ मते (मताधिक्य २८,००१) माऊली दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – ६७,३१८ मते मावळ विधानसभा निवडणूक – २०१९ सुनील शेळके (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) – १,६७,७१२ मते (मताधिक्य ९३,९४२) बाळा भेगडे (भाजपा) – ७३,७७० मते मावळच्या चौकाचौकात एकच चर्चा मावळ विधानसभा मतदारसंघाची यंदाची विधानसभा निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्यासमोर राष्ट्रवादीचे बंडखोर बापू भेगडे यांचे तगडे आव्हान होते. बापू भेगडे यांना महाविकासआघाडीसह भाजपातील बंडखोर नेत्यांचे पाठबळ मिळाले. ही निवडणूक भावकी विरुद्ध गावकी असल्याचा पुनरुच्चार अनेकदा प्रचार काळात करण्यात आला. त्यामुळे प्रतिष्ठेच्या या लढाइत नेमकं कोण बाजी मारणार, याची चर्चा गावातील प्रत्येक चौकाचौकात होत आहे.