गौतमी पाटील पुन्हा चर्चेत; छत्रपती उदयनराजे भोसलेंना दिले खास गिफ्ट

सातारा – प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटील हे नाव सध्या राज्यभरात ट्रेंडिंगला आहे. गौतमीच्या लावणीच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होत असते. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यामुळे गौतमी नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा एकदा तिची चर्चा रंगली आहे ती म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या भेटीमुळे… काल (सोमवार) साताऱ्यात गौतमीने छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना खास भेटवस्तू दिली.
गौतमी पाटीलने काल खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या साताऱ्यातील जलमंदिरया निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खासदार उदयनराजे यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. त्यानंतर तिने प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, “महाराजांना मी पहिल्यांदाच भेटले. त्यांचा आशीर्वाद कायम सोबत राहावा यासाठी मी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. महाराजांना परफ्यूम खूप आवडतो, असे मला समजले होते. त्यामुळे आम्ही महाराजांना परफ्यूम गिफ्ट केला.”
पुढे गौतमी म्हणाली की, “छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर खूप छान वाटलं. महाराजांची भेट होईल असं मला वाटले नव्हते. महाराजांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना भेटून खूप छान वाटले. त्यांना कलाकारांची खूप जाण आहे, म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. छत्रपती उदयनराजे भोसले हे आमचं दैवत आहेत. त्यामुळं मी त्यांच्यापेक्षा मोठी नाही.”
दरम्यान, गौतमीच्या विरोधात बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याच प्रकरणात सोलापुरात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र गौतमी पाटील 7 ऐवजी 10 वाजता स्टेजवर आल्याने कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी कार्यक्रम बंद पाडला.
या कार्यक्रमासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरून गौतमीने अवांतर पैसे घेतले. तसेच नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूकही केली, असं राजेंद्र गायकवाड याने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे .याबाबत तिने ‘या प्रकरणाविषयी संपूर्ण माहिती घेऊनच ‘माझी भूमिका मांडेल’ असे माध्यमांना सांगितले.





