Gautam Gambhir : टी-२० वर्ल्ड कपसाठी मोठा बदल! कोच गंभीरचा ‘यू-टर्न’; सूर्यकुमारने केला खुलासा

Gautam Gambhir U turn on his decision : आगामी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर आता रणनीतीबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. या स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच एखाद्या आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. संघाच्या घोषणेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्याने फलंदाजीच्या क्रमाबाबत एक मोठा खुलासा केला, ज्यावरून हेड कोच गौतम गंभीर यांनी आपल्या पूर्वीच्या भूमिकेत मोठा बदल केल्याचे दिसून येत आहे.
गंभीरने बदलला आपला निर्णय?
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे सहसा फलंदाजीच्या क्रमाबाबत प्रयोग करण्यासाठी ओळखले जातात. सलामीवीर वगळता इतर फलंदाजांनी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी सज्ज असावे, असे त्यांचे मत होते. फलंदाजीची ठराविक जागा असण्याला ते ‘ओव्हररेटेड’ मानत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही असेच प्रयोग पाहायला मिळाले होते. मात्र, आता वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर गंभीर यांनी आपल्या या निर्णयावरून माघार घेतल्याचे दिसत आहे.
सूर्या आणि तिलकची जागा निश्चित –
पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले की, “आम्ही तिलक वर्मासाठी तिसरा क्रमांक निश्चित केला आहे आणि मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेन.” सूर्याच्या या विधानाचा अर्थ असा की, टी-२० वर्ल्ड कपमध्ये फलंदाजांना त्यांचे ‘फिक्स्ड रोल’ देण्यात आले आहेत. तिलक वर्माने मागील काही सामन्यांत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला त्याच क्रमांकावर कायम ठेवण्यात आले आहे.
स्थिर बॅटिंग ऑर्डरचा फायदा –
सूर्यकुमार यादव स्वतः जगातील नंबर वन टी-२० फलंदाज असून चौथ्या क्रमांकावर तो अधिक धोकादायक ठरतो. या दोघांच्या जागा निश्चित केल्यामुळे संघात स्थिरता येईल आणि खेळाडूंना आपल्या जबाबदारीची स्पष्ट जाणीव असेल. गंभीर यांनी आपला ‘प्रयोगवादी’ दृष्टिकोन बाजूला ठेवून खेळाडूंच्या सोयीनुसार घेतलेला हा निर्णय टीम इंडियासाठी वर्ल्ड कपमध्ये फायदेशीर ठरू शकतो.





