नवी दिल्ली : टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर याचा फेव्हरेट खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे त्या खेळाडूला आता डबल लॉटरी लागली आहे. हा खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज हर्षित राणा. त्याने दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) 2025 मध्ये दमदार पुनरागमन केले आहे. नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सने त्याला 21 लाख रुपयांना रिटेन करत थेट कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे, हर्षितने यापूर्वी कधीही कोणत्याही संघाचे नेतृत्व केलेले नाही. तरीही, नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सने त्याच्यावर हा मोठा विश्वास दाखवला आहे. हर्षित नुकताच इंग्लंड दौऱ्यावरून परतला आहे, जिथे तो इंडिया ‘ए’ संघाकडून खेळला. याआधी त्याने आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) साठी 20.15 च्या सरासरीने 19 विकेट्स घेत आपली छाप पाडली होती. त्यावेळी गंभीर केकेआरचा मेंटॉर होता, आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने आयपीएल 2024 चे जेतेपद पटकावले. डीपीएलच्या लिलावात 6 जुलै रोजी हर्षितने प्रांशु विजयरनची जागा घेतली. हर्षितची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली होती, पण दोन सामन्यांत त्याला केवळ चार विकेट्स मिळाल्या. त्यानंतर इंग्लंड मालिकेसाठी आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांना प्राधान्य देण्यात आले, आणि हर्षितला संघात स्थान मिळाले नाही. डीपीएल 2025 मध्ये 8 संघ सहभागी होणार असून, ही स्पर्धा ऑगस्टमध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगणार आहे. मागील मोसमात इस्ट दिल्ली रायडर्सने साऊथ दिल्ली सुपरस्टार्सला हरवून पहिले डीपीएल जेतेपद जिंकले होते, तर नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स सेमीफायनलपर्यंत पोहोचली होती. हर्षितच्या नेतृत्वाखाली नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स कशी कामगिरी करते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.