Gaurav More : अभिनेता गौरव मोरे झळकणार हिंदी सिनेमात

फिल्टरपाड्याचा बच्चन अर्थात अभिनेता गौरव मोरे हा लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून त्याने लोकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. त्याच्या कॉमेडीच्या टायमिंगने प्रेक्षकांनाही खळखळून हसवलं इतकच नव्हे तर मोठ्या पडद्यावरही गौरवने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आता हाच गौरव लवकरच आपल्याला हिंदी चित्रपटात दिसणार आहे.
गौरवचा हिंदी सिनेमा नव्या वर्षात भेटीला येणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली. गौरव नव्या वर्षात संगी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात गौरव महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या सिनेमात त्याच्यासोबत शारिब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. सुमित कुलकर्णी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. गौरवचा हा सिनेमा 17 जानेवारी 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
गौरवने काय केली पोस्ट?
गौरवने त्याच्या सोशल मीडियावर या सिनेमाचं पोस्टर शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे. नवीन वर्षाची सुरुवात नव्या कामाने…आशीर्वाद असू द्या.. मैत्री हे एक असं नातं आहे जे क्षणांना आठवणींमध्ये आणि अनोळखी लोकांना कुटुंबात रुपांतरीत करतं. प्रेम, हास्य आणि मैत्रीच्या अतूट नात्याचा उत्सव असलेल्या आमच्या “संगी” चित्रपटाचं पोस्टर रिलीज करताना आनंद होतोय असे गौरवने आपल्या पोस्टमध्ये म्हंटले.
गौरवच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच तो ‘बॉईज 4’ या चित्रपटात झळकला होता. ह्या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातला. तसेच त्याचा ‘लंडन मिसळ’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना आवडला.





