Pune : गौरव आहुजाची रात्रभर पबमध्ये पार्टी; सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

पुणेः शहरातील शास्त्रीनगर चौकात एका २५ वर्षीय तरुणाने लघुशंका करत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार जागतिक महिला दिनाच्या दिवशी घडल्याने पुणेकारांमधून संतापाची लाट उसळली होती. या किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओत अलिशान गाडीतून एक तरुण उतरून भरचौकात लघुशंका करत असल्याचे दिसत होते. या प्रकरानंतर गौरव आहुजा कोल्हापूरच्या दिशेने पळून गेला होता. त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करत घडेल्या घटनेबाबत माफी देखील मागितली होती. अखेर आहुजा स्वतः कराडमध्ये पोलिसांना शरण आला. तर त्याचा मित्र भाग्येश ओसवाल याला पोलिसांनी अटक केली आहे.
आता या प्रकरणात गौरव आहुजा व त्याच्या मित्राने रात्रभर पार्टी केलेल्या पबचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. तसेच घटनेच्या दिवशी रात्रभर दोघांनी कोरेगाव पार्क येथील मुंढवा रस्त्यावरील पंचतारांकित हॉटेलमधील पबमध्ये पार्टी केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तसेच या दोघांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा पोलिसांना संशय आहे. या पार्श्वभूमीवर पबमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
दोघांवर गुन्हा दाखल
भर चौकात लघुशंका करुण गौरव आहुजा पळून गेल्यावर कारची पुढची व पाठीमागील नंबरप्लेट काढून टाकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २३८ नुसार पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. साठे कॉलनी, टिळक रस्ता), भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. प्राइड हाइट्स सोसायटी, मार्केट यार्ड) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेसह महाराष्ट्र पोलिस अधिनियम, मोटार वाहन कायदा आणि दारुबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आहुजाकडून उडवाउडवीची उत्तरे
गौरव आहुजाने पुण्यातून कोल्हापूरच्या दिशेने पळून गेला होता. हातकणंगणे येथील आंबाफाटा येथे एका पेट्रोल पंपावर त्याने आलिशान कार लावली. त्यानंतर तो भाड्याने मोटार पुण्यात घेऊन परतल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या घटनास्थळी गौरव आहुजाला नेले होते. तेथे त्याच्याकडे विचारपूस केली होते. मात्र, त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांना अंमली पदार्थाचे सेवन केल्याचा संशय
या प्रकरणातील गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवाल या दोघांनाही सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात प्रकरणाची सुनावली पार पडली. यामध्ये आहुजाच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आले आहे, तर ओसवालची रवानगी न्यायलयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलीस गौरव आहुजाच्या मोबाईलचा शोध घेत असून तो अद्यापर्यंत मिळालेला नाही. पोलिसांना या प्रकरणात आरोपींनी अंमली पदार्थाचे सेवन केल्याचा संशय आहे.





