Pune : गौरव आहुजाची येरवडा कारागृहात रवानगी; पोलिसांनी ‘ती’ अलिशान कार केली जप्त

पुणेः जागतिक महिला दिनादिवशी पुण्यात एक अत्यंत घृणास्पद प्रकार घडला होता. येरवडा येथील भरचौकात एका २५ वर्षीय तरुणाने अश्लील चाळे करत लघुशंका केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर पुणेकरांमधून अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. या प्रकरणातील आरोपी गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. साठे काॅलनी, शुक्रवार पेठ) आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओसवाल (वय २२, रा. मार्केट यार्ड) हे पार्टी करून निघाले असता भर चौकात हा प्रकार घडला होता.
त्यानंतर दोघेही कारमधून पसार झाले होते. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून भर चौकात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गौरवची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती. गौरवला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकारानंतर गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश हे दोघेही कोल्हापूरच्या दिशेने अलिशान कारमधून पसार झाले होते. कराड येथून गौरव आहुजाने पोलिसांना सरेंडर केले. तर भाग्येश ओसवाल याला पोलिसांनी अटक केली. त्याला पसार होण्यासाठी कोणी मदत केली. तसेच दोघांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते का या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. दोघेही कोल्हापूरच्या दिशेने अलिशान कारमधून पसार झाल्यानंतर कारची नंबर प्लेट बदलण्यात आली होती, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
ती अलिशान कार जप्त
गौरव आहुजा ज्या अलिशान कारमधून पळ काढला. ती कार पोलिसांनी कारवाईत जप्त केली आहे. गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांनी अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. त्यामुळे अलिशान कारला रासायनिक विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.





