पुणे | जंगली महाराज रस्त्यावर गॅस गळती

पुणे ,{प्रभात वृत्तसेवा}– जंगली महाराज रस्त्यावर एमएनजीएलच्या वाहिनीतून गॅस गळती झाल्याने घबराट उडाली. शुभम हाॅटेलजवळील गल्लीत महापालिकेडून मलनि:स्सारण वाहिनीचे काम सुरू असताना एमएनजीएलच्या वाहिनीला धक्का बसल्याने गॅसगळती सुरू झाली.
सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान आणि एमएनजीएलच्या तंत्रज्ञांनी घटनास्थळी धाव घेत गॅस गळती रोखली.
जंगली महाराज रस्त्यावर शुभम हाॅटेलशेजारी असलेल्या गल्लीत महापालिकेडून मलनि:स्सारण वाहिनीचे काम सुरू होते. दुपारी पावणेबाराच्या सुमारास यंत्राच्या सहायाने खोदाई करण्यात येत होती.
तेथील एमएनजीएलच्या वाहिनीला धक्का बसल्याने मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. गॅसच्या दुर्गंधीने शुभम हाॅटेलमधील ग्राहक बाहेर पडले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या एरंडवणे केंद्रातील तांडेल प्रवीण रणदिवे, ज्ञानेश्वर खेडेकर, किशोर बने, शंकर सोनवणे, अक्षय भोळे, फैजल कसबे, कुणाल वाघवले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
एमएनजीएलचे तंत्रज्ञही घटनास्थळी आले. मुख्य वाहिनीचा व्हाॅल्व बंद केल्याने गॅसगळती कमी झाली. मात्र, वाहिनीत गॅस साठून राहिला होता. त्यानंतर पालिकेच्या कामगारांनी पुन्हा काम सुरू केले.
जेसीबी यंत्राचा धक्का लागल्याने वाहिनीतील गॅसने पेट घेतला, त्यामुळे घबराट उडाली. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली, अशी माहिती अग्निशमन दलाच्या एरंडवणे केंद्रातील तांडेल प्रवीण रणदिवे यांनी दिली.





