Gas cylinder: घरगुती गॅस सिलिंडरचे मुंढव्यात बेकायदा रिफिलिंग
Gas cylinder:

पाइपद्वारे रिकाम्या सिलेंडरमध्ये भरणा; तिघांवर गुन्हा
Gas cylinder: घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदा पद्धतीने गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून विनापरवाना विक्री करण्याचा प्रकार मुंढवा गावात उघडकीस आला आहे.
या प्रकारात गॅसगळती होऊन आग किंवा स्फोट होण्याचा धोका असल्याने मुंढवा पोलिसांनी भूपेंद्रप्रताप सुंदर सिंह ( ३८), मानकराम सुखराम सियाक ( ३९) आणि महेंद्र बाबूराम खिचड ( १९) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भरलेल्या घरगुती सिलिंडरमधून पाइपच्या साहाय्याने गॅस काढून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये भरला जात होता. यासाठी संबंधित विभागाची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तसेच, गॅस हाताळताना आवश्यक सुरक्षा उपाययोजनाही करण्यात आल्या नव्हत्या.
७ ऑक्टोबरला सकाळी ९:३०च्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानंतर केलेल्या तपासणीत विनापरवाना गॅस काढून दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरला जात असल्याचे आढळून आले.
गॅसगळतीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला होता. पोलीस कर्मचारी एकता बाबूराव साळुंके यांच्या तक्रारीवरून मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्मिता वासनिक तपास करीत आहेत.
पोलिसांची नजर… Gas cylinder:
शहरातील अशा पद्धतीने बेकायदा गॅस रिफिलिंगच्या प्रकारांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. विनापरवाना गॅस सिलिंडर रिफिलिंग होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांनी केले आहे. शहरातील सर्व गॅस डीलर्सची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



