पुणे जिल्हा | बारापाटी शाळेत गार्डन्स फॉर लाइफ उपक्रम

राजगुरूनगर, (प्रतिनिधी)- कमान (ता. खेड) येथील बारापाटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गार्डन्स फॉर लाईफ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रधानमंत्री पोषण आहार योजनेंतर्गत शालेय परसबाग निर्मिती करण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने आवाहन करण्यात आले होते.
त्याच आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत बारापाटी कमान शाळेने आपल्या शाळेच्या परिसरात *गार्डन्स फॉर लाईफ* या उपक्रमाला सुरुवात केली आहे. कमान केंद्राच्या केंद्र प्रमुख संजीवनी घाटकर यांच्या हस्ते प्रकल्पाच्या नामफलकाचे पूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्याना शाळेमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाला व फळभाज्यांची लागवड करुन प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बारापाटी शाळेच्या विद्यार्थ्यानी शाळेच्या परिसरात मागील शैक्षणिक वर्षामध्ये भोपळा, राजमा, मिरची, पपई, शेपू, लसूण यांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करुन विद्यार्थ्यांनी शालेय परसबागेचा उपक्रम यशस्वीपणे राबविला आहे. याचा वापर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन पोषण आहार रुचकर व पौष्टिक होण्यासाठी केला जातो.
या शैक्षणिक वर्षात वाया जाणा-या पाण्याचा पुनर्वापर, सेंद्रिय खतांचे महत्त्व, सुक्या व ओल्या कच-याचे व्यवस्थापन, शून्य कचरा अभियान व दैनंदिन जीवनात उपयोगी पडणा-या औषधी वनस्पतींचा परिचय, दैनंदिन आहारातील आवश्यक पोषक तत्वे अशा विषयांवर विद्यार्थ्यांना कृतीयक्त मार्गदर्शन मिळणार आहे.
यासाठी शाळेच्या प्रयत्नांतून सर्व विद्यार्थी व पालकांना त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध प्रकारचे फळभाजी व पालेभाजीचे बीजसंच पुरविण्यात येणार आहेत. यातील सर्वोत्कृष्ट परसबागेची शाळेच्या वतीने परीक्षणानुसार निवड करुन विजेत्या विद्यार्थी व पालकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईकरे आणि प्रकल्प प्रमुख वैशाली मुके यांनी स्वतः देखील परिश्रम घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला विस्तार अधिकारी जीवन कोकणे व खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले आहे.





