पिंपरी | खोपोली पाटणकर वाड्यातील गार्डन नागरिकांसाठीच

खालापूर, (वार्ताहर) – वरची खोपोली पाटणकर वाड्यातील गार्डन हे नागरिकांसाठी आहे. मात्र, येथे शुक्रवारी (दि. ३१) हास्य क्लबने पत्र्याचा शेड बांधत असताना स्थानिक ग्रामस्थांनी तिव्र विरोध केला. नागरिकांसाठी असलेल्या गार्डनवर कोणालाही अतिक्रमण करून देणार नाही. हास्य क्लबला पर्यायी जागा द्या, अन्यथा उपोषण, आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
वरची खोपोलीतील पाटणकर वाड्यात अनेक इमारती, बंगले आहेत. परिसरातील नागरिकांसाठी गेल्या ३० ते ४० वर्षांपासून खुले गार्डन असून याठिकाणी नगरपालिकेने व्यायामाचे साहित्य बसविले. परिसरातील अबालवृध्द तसेच शेजारील जनता प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शाळेच्या वेळेत गार्डनमध्ये खेळत असतात.
रोज सकाळी हास्य क्लबचे लोक व्यायामासाठी येतात. शुक्रवारी (दि.३१) त्यांनी गार्डनमध्ये पत्र्याचा शेड बांधण्यासाठी साहित्य आणले असता स्थानिक ग्रामस्थांनी तिव्र विरोध केला व हास्य क्लबचे सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला. खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक शीतल राऊत यांनी समज दिली आहे.
पाटणकर वाड्यातील नागरिकांसाठी गार्डन आहे. या गार्डनच्या सुशोभिकरणासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. आचरसंहितेमुळे काम थांबले आहे. हास्य क्लबचे लोक व्यायामासाठी येतात, त्याला विरोध नाही. अतिक्रमण केल्यास आंदोलन व वेळप्रसंगी उपोषण करू, असे राजेश शहासने यांनी सांगितले.
पाटणकर वाड्यातील जागा मालकांनी खेळाच्या मैदानासाठी जागा नगरपालिकेला दिली आहे. नगरपालिकेने गार्डन सुशोभिकरण, व्यायाम शाळा बांधण्याचे अश्वासन दिले आहे. परंतु, तांत्रिक आडचणीमुळे थांबले आहे. हास्य क्लबसाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मगणी चंदू जोशी यांनी केली. ३० ते ४० वर्षापासून गार्डन आहे. या गार्डनवर कुठलीही संघटना येवून पत्र्याचा शेड बांधत असेल तर हे आम्हाला मान्य नाही, असे सत्तार शेख यांनी सांगितले.





