कचरा रॅम्पचे होणार यांत्रिकीकरण – आयुक्त नवल किशोर राम

पुणे : शहरातील कचरा संकलन, वाहतूक तसेच रॅम्पवरून तो प्रक्रिया प्रकल्पात पाठवला जातो. मात्र, ही कामे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केली जात असल्याने ती प्रभावीपणे होत नाहीत. परिणामी, कचऱ्याची दुर्गंधी, लिचेट, पक्षी तसेच अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरते. तसेच अवस्थाही अतिशय वाईट आहे. त्यामुळे कचरा संकलन, वाहतूक तसेच रॅम्पचे यांत्रिकीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हडपसर परिसरातील कचरा रॅम्पच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा उघड्यावर पडत असल्याने तसेच उघड्या वाहनांमधून वाहतूक होत असल्याने या रॅम्पच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पक्षांचा उपद्रव वाढला आहे. त्याचा फटका लोहगाव विमानतळाला बसत असून या पक्षांमुळे विमानांना उड्डाण करताना तसेच उतरताना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या रॅम्पसह उर्वरित सर्वच रॅम्पचे यांत्रिकीकरण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरात महापालिकेचे मुख्य सात कचरा वाहतूक रॅम्प आहेत. हे रॅम्प शहराच्या वेगवेगळ्या भागात आहेत. यामधील केवळ कात्रज येथील रॅम्पचे इंदोरच्या धर्तीवर यांत्रिकीकरण करण्यात आलेले आहे. तर उर्वरित कामासाठी खर्च अधिक असल्याचा निष्कर्ष काढत महापालिकेने हे काम मागे ठेवले होते.
पण, प्रत्यक्षात महापालिकेला कचरा वाहतूक, त्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीची समस्या, औषध फवारणी, अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या अशा कामांसाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करावा लागतो. त्यामुळे असे खर्च कमी करून यांत्रिकीकरणावर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच या विभागासाठी अशा तातडीच्या कामांसाठी स्वतंत्र निधीही उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


