चाकरमान्यांनू गणपतीक गावाक जावचा ना.! कोकणवासीयांसाठी धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; नितेश राणे म्हणाले…
Ganpati | special express : गणेशोत्सवानिमित्त कोकणवासीयांसाठी मोठी लगबग सुरु होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याहीवर्षी मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत.
विशेष म्हणजे चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांनी यंदा मोफत ट्रेन उपलब्ध केल्या आहेत. नितेश राणे गेल्या काही वर्षांपासून मोफत बस सेवा उपलब्ध करत असतात. यंदा राणे यांनी ट्रेन उपलब्ध केल्या आहेत. महत्वाचे म्हणजे या ट्रेन मोफत आहेत परंतू त्यांचे तिकीट घ्यावे लागणार आहे. या मोफत ट्रेनची माहिती राणे यांनी माध्यमांना दिली आहे.
कोकणवासीय गणेशभक्तांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस विशेष रेल्वे सेवा गेली 12 वर्षे अविरतपणे नागरिकांच्या सेवेत आहे. परंतु यंदा हि सेवा स्पेशल असून दोन ट्रेन नागरिकांच्या सेवेत सज्ज होणार आहेत.
दिनांक 23 व 24 ऑगस्ट 2025 अशा दोन दिवशी सकाळी 11 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून या रेल्वे सुटणार आहेत. याचे तिकीट वाटप सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणार आहे. तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करायची आहे.
23 ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळला थांबेल. या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल. तसेच रविवार २४ ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन वैभववाडी व कणकवली येथे थांबेल.
नितेश राणे काय म्हणाले?
गणपती बाप्पा मोरया!!! चाकरमान्यांनू गणपतीक गावाक जावचा हा ना.. चला सालाबादप्रमाणे याहीवर्षी “मोदी एक्सप्रेस” ने कोकणात जाऊया.. 23 आणि 24 ऑगस्ट 2025 रोजी डबल धमाका गणपती स्पेशल मोफत दोन विशेष ट्रेन.. सलग 13 व्या वर्षी अविरत सेवा… असं मंत्री नितेश राणे एक्सवर पोस्ट करत म्हणाले.
गणपती बाप्पा मोरया!!!
चाकरमान्यांनू गणपतीक गावाक जावचा हा ना.. चला सालाबादप्रमाणे याहीवर्षी “मोदी एक्सप्रेस” ने कोकणात जाऊया..
23 आणि 24 ऑगस्ट 2025 रोजी डबल धमाका गणपती स्पेशल मोफत दोन विशेष ट्रेन..
सलग 13 व्या वर्षी अविरत सेवा..@narendramodi@BJP4Maharashtra @Dev_Fadnavis… pic.twitter.com/peDbegfkqt
— Nitesh Rane (@NiteshNRane) August 13, 2025





