तब्बल ११ वेळा आमदार राहिलेल्या गणपत देशमुखांच्या नातवाच्या लग्नाची सर्वत्र चर्चा; साधेपणाचं होतयं कौतुक

Dr. Aniket Deshmukh | लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी लाखो, करोडो रुपये खर्च केला जातो. हेच जर लग्न एखाद्या राजकीय नेत्याच्या मुलाचे असेल, तर त्याला आणखी वेगळे स्वरूप पाहायला मिळते. मात्र शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिवंगत गणपत आबा देशमुख यांच्या नातवाच्या साध्या विवाह सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गणपत आबा देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठे नाव होते. गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर साधेपणा जपला. याच आदर्श शिकवणीतून नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांनी श्रीमंतीचे प्रदर्शन न करता विवाह साध्या, नोंदणी पद्धतीने केला आहे. अनिकेत देशमुख यांचे आजोबा गणपतराव देशमुख हे सांगोला मतदारसंघातून 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
ते एसटी बसनेही प्रवास करायचे. तोच साधेपणाचा विचार डॉ. देशमुख यांनी जोपासला आहे. याशिवाय त्यांचे सख्खे भाऊ सध्या आमदार आहेत. अशा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घरात सुद्धा साधेपणाने लग्न होऊ शकते, हे या त्यांनी दाखवून दिले आहे.
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह
लग्नातील अनावश्यक खर्च, झगमगाट आणि शाही मिरवणुका टाळून डॉ. अनिकेत देशमुख यांनी हे लग्न केले. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील पळशीप गावच्या डॉ. आस्था पाटील यांच्याशी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह केला. त्यांच्या या साध्या सोहळ्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. Dr. Aniket Deshmukh |
अनिकेत यांचा शहाजीबापू पाटील यांच्याकडून पराभव
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. अनिकेत शेकापकडून सांगोला येथून उमेदवार होते. शिवसेनेच्या ॲड. शहाजीबापू पाटील यांच्याकडून त्यांना ७६८ मतांनी पराभूत व्हावे लागले. डॉ. अनिकेत देशमुख हे अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. ते शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सेवा देत आहेत.
तर त्यांची जोडीदार डॉ. आस्था या देखील सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. आजकाल लग्नांमध्ये खूप खर्च केला जातो. अनेकजण कर्ज काढून लग्न करतात. मात्र अनिकेत आणि आस्था यांनी केलेल्या साध्या लग्नामुळे नवीन पिढीसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. Dr. Aniket Deshmukh |
हेही वाचा :





