Lucknow : गॅंगस्टर ‘संजीव जीवा’ची न्यायालय परिसरात भरदिवसा हत्या, वकिलाच्या वेषात आलेल्या…

लखनौ – उत्तर प्रदेशातील माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचा निकटवर्तीय मानला जाणारा गॅंगस्टर संजीव माहेश्वरी उर्फ जीवा याची लखनौच्या कौसर बाग न्यायालयाच्या परिसरात आज भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. वकिलाच्या वेषात आलेल्या व्यक्तीने माहेश्वरीवर गोळीबार केला. यावेळी एक मुलगी एक महिला आणि एक पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. पोलीस सुरक्षा असतानाही हत्या होण्याची उत्तर प्रदेशातील ही अलिकडच्या काळातील दुसरी घटना आहे.
काही दिवसांपूर्वीच माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याच्या भावाचीही पोलिसांच्या संरक्षणात जात असताना पत्रकार बनून आलेल्या दोघांनी हत्या केली होती. आज संजीव माहेश्वरी जीवावर गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. संजीव जीवा याच्या विरोधात 22 गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. त्याच्या पत्नीने राष्ट्रीय लोकदलाच्या तिकिटावर मुझफ्फरनगर येथून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
आजची घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले की तीन ते चार वर्षांच्या त्या चिमुरडीला पाठीत गोळी लागली आहे. ती रक्ताने माखलेली होती. तिच्या आईच्या हातालाही गोळी लागली होती. तिचा पिता तिला हातात उचलून घेऊन पळत होता आणि त्यांच्या मागे तिची आई पळत होती. ते प्रचंड कासाविस झाले होते. न्यायालयांत हे काय होते आहे? अशी विचारणा त्यांनी केली.
दरम्यान, जीवा अगोदर बाहेरच होता. त्याला गोळी लागल्यावर तो आत पळाला असे एका वकिलाने सांगितले. त्याच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. झाल्या प्रकाराची वकिलांनी निंदा केली असून यंत्रणा काय करते असा सवालही उपस्थित केला आहे.





