21 व्या शतकातील उत्तम सिनेमांमध्ये “गॅंग्ज ऑफ वासेपूर’

ब्रिटिश पेपर “द गार्डियन’ने अलीकडेच एकविसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट 100 सिनेमांची यादी प्रसिद्ध केले. या यादीत भारतातील एकाच चित्रपटाच्या नावाचा उल्लेख आहे. “गॅंग्स ऑफ वासेपूर’ या सिनेमाला या यादीमध्ये 59 वे स्थान मिळाले आहे. 2000 सालानंतर रिलीज झालेल्या सिनेमांचा या यादीसाठी विचार करण्यात आला आहे. या यादीमध्ये “देअर विल बी ब्लड’, “12 इयर्स अ स्ले’,”बॉय हूड’,”अंडर द स्किन’ आणि “इन द मूड फॉर लव’ या सिनेमांना पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळाले आहे. ख्रिस्तोफर नोलानच्या “द डार्क नाईट’ सारख्या बहुचर्चित सिनेमाला या यादीमध्ये 98 वा क्रमांक मिळाला आहे.
“गॅंग्स ऑफ वासेपुर’च्या दोन्ही भागांचे मिळून एकूण बजेट केवळ 18.5 कोटी रुपये होते. तर दोन्ही भागांची एकूण कमाई 50.80 कोटी एवढीच होती. दोन्ही भागांना मिळून एकूण 14 पुरस्कार मिळाले आहेत.
कोळशाच्या खाणीच्या पार्श्वभूमीवर असलेली गॅंगवॉरची कथा खूप हिट झाली होती. त्यामध्येही खास बिहारी ढंगाची कॉमेडी आणि खास ग्रामीण ढंगाची भाषा प्रेक्षकांच्या मनावर ठसली होती. मनोज वाजपेयी आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या रोलला खूप पसंती मिळाली होती. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश या भागातल्या व्यक्तिरेखा यापूर्वी “ओमकारा’ आणि अन्य काही सिनेमांमध्येही दिसल्य होत्या. “गॅंग्ज ऑफ वासेपुर’ नंतर ही मध्य भारतातील शैली बॉलिवूडमध्ये एकदम फिट बसली. याचीच दखल “द गार्डियन’ ने 21 व्या शतकातील 100 सिनेमांच्या यादीत या सिनेमाला स्थान देऊन घेतली आहे.





