Savitribai Phule | भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री सावित्रीबाई जोतीराव फुले

Savitribai Phule | भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्मदिन ३ जानेवारी रोजी साजरा होत आहे. नायगाव येथे विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा.
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या, ज्यांनी बाल विधवांना शिक्षण देणे, बालविवाह थांबवणे, सती प्रथेविरुद्ध लढा देणे आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचे काम केले. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी ब्रिटिश भारतातील नायगाव (तेव्हा सातारा जिल्ह्यातील) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्या काळी प्रचलित रितीरिवाजानुसार सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या नऊव्या वर्षी बारा वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी 1840 मध्ये झाला. सावित्रीबाई फुले यांनी केवळ समाजाचे शिक्षणच केले नाही तर प्लेगसारख्या साथीच्या काळात लोकोपयोगी कार्य केले.
लहानपणापासून ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते. अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. अशा अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.जोतीरावही शिकले नंतर जोतिरावांनी सावित्रीबाई यांनाही शिकवले. मुलींच्या शिक्षणाचे महत्व जाणून मुलींसाठी शाळा काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ते नेहमी म्हणत एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते म्हणून १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाई फुले मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागल्या. या शाळेत सुरवातीला दोन मुली होत्या वर्षअखेर या शाळेतील मुलींची संख्या ४० ते ४५ पर्यंत पोहचली. या शाळेमुळे शूद्र समजल्या जाणाऱ्या स्त्री वर्गास ज्ञानाची कवाडे खुली झाली. पण हे चांगले काम त्याकाळातील सनातनी वर्गास रुचले नाही. मुली शाळेसाठी घराबाहेर पडू लागल्याने धर्म बुडाला अशी आरोळी ठोकत या सनातनी लोकांनी सावित्रीबाई व जोतीरावांच्या या महान कार्यास विरोध केला. सावित्रीबाई फुले यांच्या अंगावर शेण गोळे फेकले. काहींनी तर अंगावर हात टाकण्याचाही प्रयत्न केला पण फुले दांपत्य डगमगले नाही.
१८८५ पर्यंत ३५ विधवा ब्राह्मण स्त्रिया त्यांच्याकडे आल्या. त्यांची बाळंतपणे सावित्रीबाईंनी केली. १८७४ साली काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवा त्यांच्या घरात आल्या. या काशीबाईच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले त्या मुलाचे नाव यशवंत ठेवले. यशवंतला शिकवून त्यांनी डॉक्टर बनवले. सन १८७७ साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. या दुष्काळात फुले दांपत्यांनी लोकांना खूप मदत केली. त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी जेवणाखाण्याची सोय केली. सावित्रीबाईंनी केशवपन पद्धत बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करुन नाभिकांचा संप घडवून आणला. पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची धुरा त्यांनी समर्थपणे वाहिली.
सावित्रीबाई फुले या मोठ्या साहित्यिकही होत्या. काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. १८९६-९७ साली पुण्यात प्लेगने धुमाकूळ घातला होता. प्लेग या जीवघेण्या आजाराने अनेकांचा जीव घेतला. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांची सेवा करु लागल्या. त्यांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेगची लागण झाली त्यातून १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई फुले यांचे कार्य समस्त मानवजातीला भूषणावह आहे म्हणूनच जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन!
सावित्रीबाई फुले यांचे कार्य
जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीरावांनी मुलींची शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यामुळे सावित्रीबाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हंटले जाते. इ.स. १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या. इ.स. १८५४ साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. २८ जानेवारी १८६३ साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले. बालहत्या प्रतिबंधगृह जोतीरावांनी सुरु केले असले तरी त्याच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंवर होती. १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. इ.स. १८९३ साली सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले.
इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.





