प्रभात वृत्तसेवा ओतूर – जुन्नर तालुक्यातील ओतुर पोलीस स्टेशन हद्दीत दि. २० मे रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आदेश महाराज, अरूण मुकणे व गणेश वाघ यांनी गुन्ह्याचा कट रचून फिर्यादी महिला व फिर्यादी यांचे पती यांना पैशाचा पाऊस पाडून देतो, असे सांगून विश्वासघात करून फिर्यादीकडून दोन लाख रूपय रक्कम घेवून फसवणूक केली असल्याबाबतची तक्रार ओतूर पोलीस स्टेशन येथे दि. १ ऑगस्ट रोजी आणखी दोन जणांची अशाच प्रकारे फसवणूक करणार असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. या माहितीप्रमाणे दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास ओतूर पोलीस पथक व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीणच्या पोलीस पथकाने सापळा रचून पाच जणांच्या टोळीला अटक केली.अरूण लिखरे मुकणे (रा. वसद शेलवली, अंबरनाथ, ता. कल्याण, जि.ठाणे), गौरव विश्वास शिंदे (रा. निमगाव सावा, ता. जुन्नर, जि. पुणे), राजेंद्र पद्माकर भले (रा. मोरोशी, ता. मुरबाड, जि.ठाणे), रशीद अहमद शेख (रा. बळेगाव टोकावडा, ता. मुरबाड, जि. ठाणे), गुरूनाथ गंगाराम वाघ (रा. खरोड अंबरनाथ, ता. कल्याण, जि. ठाणे) या सर्वांना खुबी हद्दीत भांगलेवस्ती येथे पत्राशेडजवळ रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी फिर्यादी महिला व तीचे पती यांना पैशाचा पाऊस पाडतो, असे सांगून त्यांचेकडून दोन लाख रूपये रक्कम घेऊन फसवणूक केली असल्याचे सांगितले. या फसवणुकीबाबत सात जणांविरुद्ध ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी यांच्याकडून गुन्हा करताना वापरलेले वाहन प्रवासी रिक्षा नं.एम.एच.०५.ई.एक्स. ९८४१ हे हस्तगत करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार संदीप लांडे हे करत आहेत. दि. २ रोजी जुन्नर न्यायालयात हजर केले असता आरोपींना ३ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली.