Newasa News : नेवासा शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; कर्नाटक पासिंग गाड्यांमधून टेहळणी, रात्री साडी घालून दरोड्याचा प्रयत्न?
Newasa News : नेवासा शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून स्थानिक नागरिकांची झोप उडाली आहे.

Newasa News : नेवासे शहर आणि परिसरात गेल्या दोन-चार दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून नागरिकांची झोप उडाली आहे. चोरट्यांच्या दहशतीने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. (Newasa News)
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चोरटे कर्नाटक पासिंगच्या दोन ते तीन चारचाकी गाड्यांमधून फिरत आहेत. दिवसा या गाड्या शहरात आणि परिसरात टेहळणी करतात आणि रात्रीच्या अंधारात बंद घरे, दुकाने फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा नागरिकांतून सुरु आहे. (Newasa News)
१० ते १५ जणांची टोळी, साडी घालून चोरीचा नवा फंडा
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या टोळीत १० ते १५ जणांचा समावेश असून त्यातील काही चोरटे रात्री महिला असल्याचा बनाव करण्यासाठी साडी घालून येतात, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंधारात ओळख पटणे कठीण होते. “चोर आले रे आले” असा बोभाटा अनेक भागात होत असून अफवांचेही पीकही मोठ्या प्रमाणात फुटले आहे. (Newasa News)
या चोरट्यांच्या दहशतीमुळे नेवासे फाटा आणि शहरातील तरुण वर्ग आता एकजूट झाला आहे.रात्री रात्रभर जागरण करत, हातात काठ्या घेऊन तरुण गल्लोगल्ली गस्त घालत आहेत आणि पोलिसांना माहिती देऊन चोरट्यांचा शोध घेत आहेत. (Newasa News)
नेवासा पोलिस अपयशी?
शहरात मागील काही दिवसांत तीन-चार ठिकाणी झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यातच नेवासा पोलीस अपयशी ठरले आहेत, असा आरोप थेट नागरिक करत आहेत. आता पुन्हा याच चोरट्यांनी पोलिसांसमोर एक नवे आव्हान उभे केलेले आहे. (Newasa News)
घटना घडल्यानंतर घटनास्थळी जाऊन पंचनामा करणे आणि “तपास सुरू आहे” असे सांगणे, ही नेवासा पोलिसांची नेहमीचीच कार्यपद्धत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. प्रतिबंधात्मक गस्त, नाकाबंदी आणि रात्रीची पेट्रोलिंग वाढवण्याची गरज असताना पोलीस वराती मागून घोडे दमटवत असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे. (Newasa News)





