Ganeshotsav: साताऱ्याची बाजारपेठ सजली! गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी बाजारात आल्या ‘या’ भन्नाट वस्तू
Ganeshotsav: पारंपरिक फुलांच्या माळांपासून ते मंदिरांच्या भव्य प्रतिकृतींपर्यंत; साताऱ्यातील दुकानांमध्ये गणेशभक्तांची खरेदीसाठी लगबग.

Ganeshotsav – यंदाचा गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने शहरातील बाजारपेठा गणेशभक्तांच्या स्वागतासाठी सज्ज होऊ लागल्या आहेत. गणेशमूर्तींसोबतच घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले असून, खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत सजावटीच्या साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता पाहायला मिळत आहे.
रंगीबेरंगी फुलांच्या माळा, तोरणे, झुंबर, आकर्षक पडदे, लायटिंगच्या माळा, एलईडी दिवे, कागदी व कापडी सजावट, मोत्यांच्या माळा, कृत्रिम फुले, फुलांचे हार, विविध प्रकारचे डेकोरेशन सेट तसेच मंडप सजावटीसाठी आवश्यक साहित्य दुकानदारांनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. विशेषतः एलईडी आणि आकर्षक रोषणाईच्या माळांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. पारंपरिक सजावटीबरोबरच यंदा थीमवर आधारित सजावटीकडेही नागरिकांचा कल वाढला आहे.
त्यामुळे घरगुती गणपतीसाठी छोट्या आकारातील सजावटीचे सेट, बॅकड्रॉप, मंदिराच्या प्रतिकृती, आकर्षक पडदे आणि फुलांची सजावट बाजारात उपलब्ध झाली आहे. गणेश मंडळांसाठीही विविध आकारांचे मंडप, सजावटीचे कापड, थर्माकोल व इतर सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई तसेच आकर्षक प्रवेशद्वार तयार करण्यासाठी लागणार्या वस्तूंची मागणी वाढत आहे. बाजारपेठेत विविध किमतींच्या वस्तू उपलब्ध असल्याने ग्राहकांना आपल्या बजेटनुसार खरेदी करता येत आहे.
दरम्यान, गणेशोत्सवातील सजावटीसाठी पर्यावरणपूरक साहित्यालाही यंदा प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. कागद, कापड, नैसर्गिक फुले तसेच पुनर्वापर करता येणार्या वस्तूंपासून तयार केलेल्या सजावटीच्या साहित्याला ग्राहक पसंती देत आहेत. गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून, मूर्ती बुकिंग, सजावटीचे साहित्य आणि पूजासाहित्याच्या खरेदीमुळे सातार्याच्या बाजारपेठेत सणाचा उत्साह हळूहळू रंगू लागला आहे.




