गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’; विधानसभेत घोषणा, ‘हे’ देखावे करण्याचे आवाहन

मुंबई : लोकमान्य टिळकांनी १८९३ साली सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला आज ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत ही घोषणा केली. गणेशोत्सवाची सामाजिक, राष्ट्रीय, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाशी नाळ जोडलेली आहे. हा उत्सव महाराष्ट्राचा गौरव असून, त्याची व्याप्ती आणि संस्कृती जगभर पसरवण्यासाठी महायुती सरकार कटीबद्ध आहे, असे शेलार म्हणाले.
काहींनी गणेशोत्सवाच्या परंपरेला अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे अडथळे दूर केले. पीओपी मूर्तीवरील बंदीच्या मुद्द्यावर काकोडकर समितीच्या अहवालानंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या संमतीने निर्बंध हटवले गेले. न्यायालयाच्या निर्णयानुसार पीओपी मूर्ती बनवणे, प्रदर्शन आणि विक्रीस परवानगी मिळाली आहे.
शेलार यांनी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल, असे सांगितले. पोलिस सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गणेशोत्सव मंडळांना ‘ऑपरेशन सिंदूर’, सैनिक, सामाजिक उपक्रम आणि महापुरुषांवर आधारित देखावे करण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणपूरक आणि सामाजिक भान जपणारा हा उत्सव महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून साजरा करण्याचा आनंद असल्याचे शेलार म्हणाले.





