ganeshotsav 2023 : राज्यासह देशभरात दहा दिवस आपल्या घरी मुक्कामाला असलेल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप देण्यात येणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी विसर्जन मिरवणुका काढण्यात येत आहेत. मिरवणुकांमध्ये आकर्षक देखावे पाहण्यासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र याच गर्दीचा फायदा काही समाजकंटक देखील घेतात. विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीमध्ये मोबाईल चोरांची तर दिवाळीच होत असते. त्यामुळे आपला मोबाईल देखील चोरीला जाऊ नये, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.
आपला मोबाईल चोरीला जाऊ नये यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मोबाईल शर्टच्या खिशात, किंवा जीन्सच्या मागच्या खिशात ठेऊ नये. शक्यतो जीन्सच्या समोरच्या खिशात मोबाईल ठेवावा. महिलांनी आपल्या पर्समध्ये मोबाईल ठेवल्यास, ती खांद्यावर न लटकवता हातातच ठेवावी.
बाहेर जाताना मोबाईलचे लोकेशन ऑन असेल याची खात्री करा. यामुळे तुमचा मोबाईल हरवला, तरी लोकेशन ट्रॅक करून त्याचा शोध घेणे शक्य होते.
जर तुमच्या मोबाईल गर्दीत हरवला तर तुमच्या मोबाईल खरेदीची पावती, मोबाईलचा बॉक्स आणि आयएमईआय नंबर या गोष्टीच्या माध्यमातून तुमचा मोबाईल शोधात येऊ शकतो. त्यामुळे मोबाईल खरेदीची पावती, मोबाईलचा बॉक्स आणि आयएमईआय नंबर सांभाळून ठेवावे. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, तर पोलीस या IMEI नंबरच्या मदतीने तुमचा मोबाईल ट्रॅक करू शकतात.
जर तुम्ही मोबाईलचा विचार करत असाल तर थांबा केवळ मोबाईलच नाही, तर विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फायदा घेऊन तुमची दुचाकी देखील चोरीला जाऊ शकते. त्यामुळे शक्यतो सुरक्षा रक्षक असेल अशा पार्किंग लॉटमध्ये, किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येईल अशा ठिकाणी दुचाकी पार्क करावी.