पुणे – आज अनंत चतुर्दशीनिमित्त विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह राज्याच्या विविध भागातून नागरिक शहरात येत असतात. पुण्यातील मानाच्या पाच गणपतीच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे. पुण्यात गणपती विसर्जनानिमित्त भाविकांची तुफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुलालाची उधळण करण्यात येत आहे. सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पुण्यातील मुख्य मिरवणुकीला 10:30 वाजता सुरुवात झाली आहे. मंडईतील संपूर्ण परिसर भाविकांनी आणि ढोल वादकांनी गजबजून गेला आहे. मंडई परिसरात कसबा गणपतीची आरती करत या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांचा गणपती विसर्जनानिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळाला. मिरवणूकीदरम्यान चंद्रकांत दादा यांनी लक्ष्मी रोडने चालत येत भाविकांच्या भेटी घेतल्या, लहान मुलांसह भाविकांना चॉकलेट वाटप केले. याशिवाय त्यांनी ढोल वादनाचा आनंदही घेतला.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे. आता तुळशीबाग गणपती बेलबाग चौकाकडे मार्गस्थ झाला आहे. गुलाल आणि फुलांची उधळण करत मोठ्या आनंदात गणरायाला निरोप दिला जात आहे. गणरायाच्या मिरवणुकीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान तुळशीबाग गणपतीला स्वराज्य ढोल पथकाकडून 21 ध्वजाची सलामी देखील देण्यात आली आहे. सध्या येथील परिसर ढोल-ताशाच्या आवाजाने दुमदुमून गेला आहे.